उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील एका कॉन्स्टेबलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कॉन्स्टेबलने सांगितलं की, ऑनलाइन गेमिंगमध्ये त्याने तब्बल १० ते १५ लाख रुपये गमावले आहेत. त्यामुळे त्याच्यावर कर्ज झाले आहे. अशा परिस्थितीत आत्महत्या करण्यास भाग पाडलं जाऊ शकतं असंही म्हटलं आहे. याबाबत त्याने वरिष्ठ अधिकाऱ्याची मदत घेतली.
कॉन्स्टेबलचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलीस विभागाने या प्रकरणाची दखल घेत त्याच्याशी बोलणं सुरू केलं आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये कॉन्स्टेबल म्हणतो की, विभागातील लोकांनी त्यांच्या पगारातून मला ५००-५०० रुपयांची मदत केली तर माझं कर्ज माफ होईल आणि सामान्य जीवन जगू शकेन. तसं न झाल्यास आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं लागू शकतं.
सुनील कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी कॉन्स्टेबलला समजावून सांगितलं आहे. तसेच त्याचं समुपदेशन केलं आणि काळजी करू नको, सर्व काही ठीक होईल असा विश्वास दिला. कॉन्स्टेबल ४-५ दिवस ड्युटीवरून बेपत्ता होता. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या कॉन्स्टेबलचं नाव सूर्य प्रकाश असून तो उन्नाव जिल्ह्यातील कार्यालयात तैनात आहे.
या संपूर्ण प्रकरणाबाबत सोनम सिंह यांनी सांगितले की, २४ सप्टेंबर रोजी एका कॉन्स्टेबलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओची दखल घेऊन तपास केला असता, तो व्हिडीओ कॉन्स्टेबल सूर्य प्रकाशचा असल्याचं आढळून आलं. त्याने ऑनलाइन गेमिंगमध्ये १० ते १५ लाख रुपये गमावले आहेत. या प्रकरणातील प्रत्येक मुद्द्याची सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल.