नवी दिल्ली - नवऱ्याची कोणतीही चूक नसताना एखादी महिला वारंवार तिचे सासरचे घर सोडून जात असेल तर ती मानसिक क्रूरता असल्याचे म्हणत दिल्ली उच्च न्यायालयाने पतीला घटस्फोट मंजूर केला आहे.
न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्ण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले की, विवाह हा एकमेकांना कोणत्याही संकटात पाठिंबा, एकनिष्ठपणा आणि वचनबद्धता यांच्या सुपीक मातीत फुलतो. एकमेकांपासून अंतर राखणे आणि सोडून जाण्यामुळे हे नाते तुटले जाते. त्यामुळे मागे केवळ जखमा उरतात.
वेगळे होण्यासाठी खूप वेळ लागल्यामुळे वैवाहिक बंधन राहत नाही. सहवास आणि वैवाहिक संबंध संपुष्टात आणणे किंवा त्यापासून वंचित ठेवणे हेदेखील अत्यंत क्रूरतेचे कृत्य आहे, असे कोर्टाने म्हटले.
पतीचा आरोप काय? घटस्फोटाची मागणी करताना, पतीने पत्नीचा स्वभाव अतिशय त्रासिक आणि अस्थिर असून, तिने किमान सात वेळा मला सोडले होते. १९ वर्षांच्या त्यांच्या संसारात ती प्रत्येक तीन ते १० महिन्यांच्या काळात वेगळे होई आणि घर सोडून जाई, असे त्याने म्हटले आहे.