लखनौ - 'मंदिर वही बनाएंगे' असा नारा देत नव्वदच्या दशकात भारतीय जनता पक्षाने आपली पाळेमुळे संपूर्ण उत्तर भारतात विस्तारली होती. मात्र केंद्रात आणि उत्तर प्रदेशात स्वबळावर सत्ता स्थापूनही भाजपाला अयोध्येत राम मंदिर बांधणे काही शक्य झालेले नाही. आतातर अयोध्येत मशीद बांधली पाहिजे, असे वक्तव्य करून भाजपाच्या एका नेत्याने नव्या वादाला तोंड फोडले आहे. भाजपाचे विधान परिषद आमदार बुक्कल नवाब यांनी लखनौमधील अल्पसंख्याक मोर्चाच्या एका कार्यक्रमात हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे या कार्यक्रमातही जोरदार गोंधळ झाला. तसेच नवाब यांना तातडीने मंचावरून हटवण्यात आले. विशेष बाब म्हणजे बुक्कल नवाब यांनी जेव्हा हे वक्तव्य केले तेव्हा केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वीसुद्धा मंचावर उपस्थित होते. दरम्यान, वादाला तोंड फुटल्यानंतर बुक्कल नवाब यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना माझे बोलणे उपस्थितांना व्यवस्थित कळले नाही, असा दावा केला. मिळालेल्या माहितीनुसार बुक्कल नवाब यांनी अल्पसंख्याक मोर्चाच्या कार्यक्रमात बोलताना अचानक अयोध्येमधील वादग्रस्त जमिनीच्या मुद्द्याला हात घातला. त्यानंतर तेथे मशीद बांधण्याची मागणी त्यांनी केली. भाजपा आमदाराच्या विचित्र पावित्र्यामुळे सभेत गोंधळ माजला. तसेच संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. या गोंधळादरम्यान, बुक्कल नवाब यांना मंचावरून तातडीने हटवण्यात आले. मात्र त्यानंतरही बुक्कल नवाब यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू होती.
अयोध्येत मशीद बांधा, चक्क भाजपाच्याच नेत्याने केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 4:57 PM