अहमदाबाद - भारतीय संविधानाच्या मसुदा बीएन राव यांनी तयार केला होता. ते ब्राह्मण होते असा दावा गुजरात विधानसभा अध्यक्ष राजेंद्र तिवारी यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला आहे. तिवारी यांच्या या विधानावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचसोबत अभिजीत बॅनर्जीसह ९ भारतीय नोबेल विजेत्यांपैकी ८ ब्राम्हण होते असंही त्यांनी सांगितले. अहमदाबादमध्ये ब्राह्मण संमेलनादरम्यान ते बोलत होते. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणीही उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजेंद्र तिवारी म्हणाले की, जगातील ६० देशांच्या संविधानाचा अभ्यास केल्यानंतर भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यात आला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानाचा मसुदा कोणी दिला याची माहिती तुम्हाला आहे का? जेव्हा कधीही संविधानाचा उल्लेख केला जातो तेव्हा आपण सर्व सन्मानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतो. पण त्यांच्या शब्दात मसुदा बंगाल नरसिंह राव जे ब्राह्मण होते त्यांनी तयार केला होता असं त्यांनी सांगितले.
तसेच इतिहास सांगतो की, ब्राह्मण नेहमी दुसऱ्यांना पुढे करत असतो. हे बीएन राव होते ज्यांनी बाबासाहेबांना पुढे ठेवलं. आम्हाला बाबासाहेब आंबेडकर यांचा गर्व आहे की, त्यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेच्या भाषणात ही गोष्ट मान्य केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं ते मी सांगतो. जे श्रेय मला दिलं जात आहे ते माझं नाही तर बीएन राव यांचे आहे असंही राजेंद्र तिवारी यांनी कार्यक्रमात सांगितले.