लखनौ - अयोध्येतील राम मंदिराच्या जागेवर भगवान गौतम बुद्ध यांचे मंदिर बांधा, अशी मागणी भाजपा खासदाराने केली आहे. उत्तर प्रदेशच्या बहराइच जिल्ह्यातील भाजपा खासदार सावित्री बाई फुले यांनी ही मागणी केल्यानं राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. या जागेतील उत्खननावेळी अनेक प्रतिमा मिळाल्या आहेत. तसेच अनेक तज्ञांच्या सर्वेक्षणातूनही या जागेचे बौद्ध धर्माशी जवळचे नाते असल्याचे समोर आल्याचे फुले यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन दिवसांपूर्वीच अयोध्येत आपण राम मंदिराच्या उभारणीची तयारी करत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर, भाजपच्याच खासदार असलेल्या सावित्रीबाई फुलेंनी असे विधान करून पुन्हा नवीन वादाला तोंड फोडले आहे. प्रयागराज येथे पत्रकारांशी संवाद साधताना, आम्ही अयोध्येतील वादग्रस्त जागेवर गौतम बुद्धांचे मंदिर बाधण्याची मागणी करत आहोत. कारण, बौद्ध हा एकमवे धर्म आहे, जो जाती आणि वर्गाच्या आधारावर कुणाशाची भेदभाव करत नाही, असे खासदार फुले यांनी म्हटले आहे. भाजपा व त्यांच्या सहकारी पक्षांचा दलित आणि आरक्षणाला विरोध असल्याचे फुले यांनी म्हटले. तसेच मी खात्रीशीरपणे जिंकणारी उमेदवार होते, म्हणूनच भाजपाने 2014 साली मला तिकीट दिलं. पण, मी केवळ माझ्या संघर्ष आणि समर्पणामुळे जिंकले आहे. आता, भाजापाकडून दलित आणि गरीबांच्या अधिकारांना कुचलण्याचे काम होत असून संविधान बदलण्याचा डाव असल्याचेही फुले यांनी म्हटले.