लडाख : सीमेवर सातत्याने कारवाया करणाऱ्या चीनची नवी कुरापत समाेर आली आहे. लडाखच्या पॅंगाॅंग त्साे तलावाजवळ चीनने आणखी एक पूल बांधायला सुरुवात केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, हा पूल अधिक मजबूत आणि माेठा असून, त्यावरून चिनी सैन्याची कवचधारी व सशस्त्र वाहने जाऊ शकतील. या बांधकामाकडे लक्ष असून, चीनच्या ताब्यात असलेल्या भूभागावर पूल उभारण्यात येत असल्याचे भारताच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे.
पॅंगाॅंग त्साे तलावाजवळ चीनने यापूर्वीच एक पूल बांधला आहे. त्याचे बांधकाम एप्रिलमध्ये पूर्ण झाले. उपग्रहाच्या छायाचित्रांद्वारे हे स्पष्ट झाले. यासंदर्भात जानेवारीमध्ये प्रसारमाध्यमातून बातम्या झळकल्या हाेत्या. मात्र, या पुलाच्या बाजूलाच आणखी एका पुलाचे बांधकाम सुरू झाल्याचे आढळले आहे.
भारताचे लक्ष - परराष्ट्र मंत्रालय
चीनच्या बांधकामासंदर्भात परराष्ट्र प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, गेल्या अनेक दशकांपासून बांधकाम सुरू असलेला भाग चीनच्या ताब्यात आहे. याकडे भारताचे लक्ष असून, चीनसाेबत राजनैतिक तसेच लष्करी पातळ्यांवर चर्चा सुरू राहणार असल्याचे बागची यांनी स्पष्ट केले.
चीनचा गेम प्लॅन
पुलांचे बांधकाम करण्यामागे चीनचे खास डावपेच दिसून येतात. रुडाेकमार्गे खुर्नाक येथून तलावाच्या दक्षिणेकडे येण्यासाठी १८० किलाेमीटर अंतर पार करावे लागते.
पुलामुळे ते ४० ते ५० किलाेमीटरने कमी हाेईल. भारतासाेबत संघर्ष झाल्यास लष्करी रसद लवकरच पाेहाेचावी, यासाठी पूल बांधण्यात येत आहे.
ताबा रेषेपासून २० किमीवर पूल
- नवा पूल तुलनेने माेठा आहे. त्याचे बांधकाम दाेन्ही बाजूने करण्यात येत आहे.- प्रत्यक्ष ताबा रेषेपासून पुलाचे अंतर केवळ २० किलाेमीटर एवढे आहे. - आधी लहान पूल पूर्ण करण्यात आला. त्याचा वापर माेठ्या पुलासाठी साहित्य पुरवठा करण्यासाठी हाेत आहे.