अयोध्येमध्ये बांधण्यात येत असलेल्या राम मंदिराच्या बांधकामामध्ये मोठा अडथळा आला आहे. मागच्या तीन महिन्यांपासून राम मंदिराच्या बंधाकामाचा वेग मंदावला आहे. तसेच मंदिर उभारण्याचं काम अधांतरी लटकलं आहे. राम मंदिराचं बांधकाम करत असलेल्या कारागिरांमुळे मंदिराचं काम रखडल्याचं समोर आलं आहे. हे कारागिक आपापल्या घरी परतले असून, ते पुन्हा मंदिराच्या कामासाठी परत येण्यास उत्सूक नाही आहेत. मंदिराचं बांधकाम करण्याची जबाबदारी घेतलेल्या एल अँड टी कंपनीचं म्हणणंही ऐकण्यास हे कारागिर तयार नाही आहेत. या सर्व घडामोडींची गंभीर दखल राम मंदिर बांधकाम समितीचे चेअरमन नृपेंद्र मिश्रा यांनी घेतली आहे. तसेच त्यांनी कंपनीला लवकरात लवकर २०० कारागिरांची व्यवस्था करण्यास सांगितले आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार राम मंदिराच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या कारागिरांची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. मागच्या ३ महिन्यांपासून राम मंदिराच्या उभारणीचं काम मंदावलं आहे. त्यामुळे राम मंदिर उभारणीचं काम पूर्ण करण्यासाठी जी तारीख निश्चित करण्यासाठी जी तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यापेक्षा दोन महिने अधिक वेळ लागू शकतो. राम मंदिराचं बांधकाम पूर्ण होण्यासाठी डिसेंबर २०२४ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र आता कारागिरांची कमतरता भासत असल्याने मंदिराचं बांधकाम पूर्ण होण्यास अधिक कालावधी लागू शकतो.
राम मंदिराचं बांधकाम करत असलेल्या कारागिरांची टंचाई निर्माण होण्यामागे येथील तीव्र उन्हाळा हे प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जात आहे. तीव्र उन्हाळ्यामुळे येथील कामगार आपापल्या घरी परतले. मात्र आता त्यांना माघारी कामावर आणण्यात मंदिराचं काम करणाऱ्या कंपनीला यश येत नाही आहे. याबाबत काल एक बैठकही बोलावण्यात आली होती. त्या बैठकीमध्ये राम मंदिर निर्मिती समितीचे प्रमुख नृपेंद्र मिश्र यांनी कंपनीला सांगितलं की, राम मंदिराचं बांधकाम पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०२४ पर्यंती मुदत निश्चित करण्यात आली आहे. मंदिराच्या कळसाची उभारणी करणं हे मुख्य आव्हान आहे. दुसऱ्या मजल्याचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच कळस उभारता येणार आहे.
याच गतीने बांधकाम सुरू राहिलं, तर मंदिराचं बांधकाम पूर्ण होण्यास २ महिने विलंब होऊ शकतो. त्यामुळे एल अँड टी कंपनीने कारागिरांची संख्या त्वरित वाढवावी. तसेच मागच्या तीन महिन्यांपासून मंदावलेला राम मंदिराच्या उभारणीचा वेग वाढवावा, असे नृपेंद्र मिश्र यांनी सांगितले.