उडिपी (कर्नाटक ): अयोध्येत उद््ध्वस्त केल्या गेलेल्या बाबरी मशिदीच्या २.५ एकर वादग्रस्त जागेच्या मालकीचा अंतिम फैसला करण्यासाठी, सर्वोच्च न्यायालयात येत्या दोन आठवड्यांत सुनावणी सुरू होणार असतानाच, विश्व हिंदू परिषदेने ‘मंदिर वही बनायेंगे’चा दुसरा अध्याय सुरू करत, अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम सुरू करण्याची तारीख जाहीर केली आहे.गेले तीन दिवस येथे भरलेल्या ‘धर्म संसदे’च्या समारोपाच्या कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय सहसचिव सुरेंद्र कुमार जैन यांनी पुढील वर्षी १८ आॅक्टोबरपासून राम मंदिराचे बांधकाम सुरू केले जाईल, अशी घोषणा केली. उपस्थितांनी याचे उत्स्फूर्तपणे अनुमोदन केले. मंदिर बांधकामासोबतच पुढील वर्षाची ‘धर्म संसद’ही अयोध्येच भरविली जाईल, असेही जैन यांनी सांगितले. याच ‘धर्म संसदे’च्या उद््घाटन समारंभात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अयोध्येत राम मंदिर नक्की बांधले जाईल, असा विश्वास व्यक्त केला होता. ही केवळ लोकांना खूश करण्यासाठीची घोषणा नाही, तर ही आमची ठाम श्रद्धा आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले होते. हा वाद न्यायालयात असला, तरी मंदिर बांधकामासाठी गेल्या काही काळात अनुकूल वातावरण तयार झाले असल्याचेही भागवत म्हणाले होते.विश्व हिंदू परिषदेने नियोजित मंदिर ठरल्या जागी आणि देशभरातून गोळा केलेल्या ‘रामशिला’ वापरूनच बांधले जाईल, असेही म्हटले होते. (वृत्तसंस्था)निवडणुकीसाठी राजकारणअयोध्येतील वादग्रस्त जागेची तीन भागांत वाटणी करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध केल्या गेलेल्या अपिलांवर, सर्वोच्च न्यायालयात येत्या ५ डिसेंबरपासून अंतिम सुनावणी सुरू होणार आहे.न्यायालयाच्या निकालाची वाट न पाहता, मंदिर बांधकामाचा विषय पुढे आणण्यावरून काँग्रेस व मुस्लीम संघटनांनी टीकाकरत, गुजरात निवडणुकीसाठी हे राजकारण केले जात असल्याचा आरोप केला आहे.
अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम पुढील वर्षापासून - विहिंपची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 6:24 AM