भोपाळ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मध्य प्रदेशच्या दौ-यावर आहेत. या दौ-यादरम्यान त्यांनी पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आणला आहे. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील मऊसहानिया येथे महाराज छत्रसाल यांची 52 फूट उंच प्रतिमेच्या अनावरण सोहळ्यात ते सहभागी झाले होते. या सोहळ्यात संबोधित करत असताना मोहन भागवत म्हणाले की, राम मंदिर बांधणे आमची केवळ इच्छा नाही तर हा आमचा संकल्प आहे आणि हा संकल्प आम्ही पूर्णत्वास नेणार. शिवाय राम मंदिर बांधण्याची आताची वेळ अनुकूल असल्याचंही त्यांनी म्हटले. यामुळे जे राम मंदिर बांधणार आहेत त्यांनी रामाप्रमाणे होण्याची आवश्यकता आहे. तेव्हाच हे कार्य शक्य आहे, असंही ते म्हणालेत
अशा पद्धतीनं मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आणत नवीन प्रश्न निर्माण केले आहेत. दरम्यान त्यांच्या विधानावर विरोधी पक्षनेते काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राममंदिर निर्धारित जागीच बनणार - भय्याजी जोशी
राममंदिर मात्र निर्धारित जागेवरच बांधणार. तेथे इतर काहीच बनू शकत नाही, असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते. ''राममंदिर हा देशातील कोट्यवधी नागरिकांच्या श्रद्धेचा विषय आहे. न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारावर राममंदिर उभारणीसाठी प्रक्रिया सुरू होईल. या मुद्द्यावर सर्व समाजांचे एकमत होणे कठीण बाब आहे. यासाठी होणा-या प्रयत्नांचे स्वागतच आहे. परंतु राममंदिर मात्र निर्धारित जागेवरच बनणार. तेथे इतर काहीच बनू शकत नाही, असे भय्याजी जोशी म्हणाले होते.