अयोध्या : अयोध्येतील राममंदिराच्या पायाभरणीसाठीची पहिली वीट १० जून रोजी ठेवली जाऊन मंदिर बांधकामाला सुरुवात होईल, अशी माहिती मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या प्रवक्त्याने दिली. यावेळी राम जन्मभूमी ठिकाणावरील कुबेर टिळा येथे भगवान शंकराच्या प्रार्थना केल्या जातील. हीच राम जन्मभूमी सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाने उपलब्ध करून दिली आहे.
लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी श्रीराम यांनी भगवान शंकराला प्रार्थना केली होती. ती परंपरा यावेळी ‘रुद्राभिषेक’ करून पाळली जाईल, असे श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्य गोपाल दास यांचे प्रवक्ते महंत कमल नयन दास यांनी सांगितले. मंदिराच्या पायाभरणीचे काम विशेष प्रार्थनांनंतर सुरू होईल. या प्रार्थना महंत नृत्य गोपाल दास यांच्या वतीने कमल नयन दास आणि इतर पुजारी सकाळी आठच्या सुमारास सुरू करतील. हा धार्मिक विधी जवळपास दोन तास चालेल.गेल्या मार्च महिन्यात राम लल्लांची मूर्ती तात्पुरत्या मंदिराच्या ठिकाणाहून समारंभपूर्वक नव्या ठिकाणी हलवण्यात आली व मंदिराच्या बांधकामाचा मार्ग खुला झाला. ११ मार्च रोजी बांधकामाच्या ठिकाणाचे सपाटीकरण करण्यासाठी यंत्रसामग्री आणून ठेवली गेली होती.