बेंगळुरूमध्ये एका रेस्टॉरंटने एका व्यक्तीकडून बिलात 40 पैसे अधिक घेतले. ही गोष्ट त्या कस्टमरला सहन न झाल्याने, तो थेट कंझ्यूमर कोर्टात (Consumer court) पोहोचला. मात्र, ग्राहकन्यायालयाने निकाल देत, संबंधित ग्राहकालाच 2000 रुपये रेस्टॉरंटला आणि 2000 रुपये न्यायालयाला दंड स्वरुपात भरण्याचा आदेश दिला. (Restaurant bill case)
बिल पाहून संतापले होते आजोबा -हे प्रकरण 2021 चे आहे. मूर्ती नावाच्या एका वृद्ध व्यक्तीने शहरातील हॉटेल एम्पायरमध्ये भोजन ऑर्डर केले होते. जेव्हा ते ऑर्डर घेण्यासाठी गेले, तेव्हा स्टाफने त्यांना 265 रुपयांचे बिल दिले. मात्र, त्यांचे एकूण बिल 264.60 रुपये एढे होते. मूर्ती यांनी यासंदर्भात स्टाफकडे विचारणा केली. मात्र, त्यांना योग्य उत्तर न मिळाल्याने ते बेंगळुरू कंझ्यूमर कोर्टात पोहोचले आणि रेस्टॉरंटवर लोकांची लूट करत असल्याचा आरोप लावला.
या खटल्यात आजोबांनी स्वतःच केला स्वतःचा बचाव -1 रुपयांची भरपाई मागत मूर्ती म्हणाले, या घटनेमुळे आपल्याला धक्का बसला आहे आणि आपण अस्वस्थ झालो आहोत. 26 जून 2021 रोजी, मूर्ती यांनी स्वत:च न्यायालयात आपली बाजू मांडली होती. तर रेस्टॉरंटच्या वतीने वकिल अंशुमन एम आणि आदित्य एम्ब्रोस यांनी युक्तिवाद केला. तक्रार खूपच लहान आणि त्रासदायक असल्याचे दोघांचे म्हणणे होते. वस्तू आणि सेवा कर कायदा-2017 च्या कलम 170 अंतर्गत, असे करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
50 पैशांपेक्षा अधिक झाल्यास एक रुपया असेल -8 महिन्यांपासून सुरू असलेल्या या खटल्यात न्यायाधीश म्हणाले, भारत सरकारच्या नियमांनुसार 50 पैशांपेक्षा कमी पैसे दुर्लक्षित केले जातात आणि अधिक झाल्यास एक रुपया घेता येतो. वेळ वाया घालवल्याबद्दल कोर्टाने मूर्ती यांना फटकारले. तसेच, 4 मार्च 2022 रोजी न्यायालयाने, 2000 रुपये रेस्टॉरंटला आणि 2000 रुपये न्यायालयाला दंड स्वरुपात भरण्याचे आदेश दिले आहेत. हा दंड मूर्ती यांना 30 दिवसांत भरायचा आहे.