नवी दिल्ली : ग्राहक आता आॅनलाइन खरेदीला अधिक पसंती देऊ लागले आहेत. एकूण खरेदीपैकी ८0 टक्के खरेदी आता आॅनलाइन होत आहे. एका अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. याहू आणि माइंडशेअर यांनी एकत्रितरीत्या हा अभ्यास केला. त्यांनी जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, ३१ टक्के ग्राहक दुकानातील खरेदीत वेळ जात असल्याने आॅनलाइन खरेदीला प्राधान्य देत असल्याचे अहवालात समोर आले आहे. आॅनलाइन खरेदीमुळे वेळ वाचतो. बाजारात होणारी पायपीटही वाचते. आपल्याला हवी ती वस्तू आॅनलाइन पाहता येत असल्यामुळे घरबसल्या आपल्या पसंतीची वस्तू मिळते. अशा परिस्थितीत मेहनत वाचविण्यासाठी लोक आॅनलाइन खरेदीला प्राधान्य देऊ लागल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. माइंडशेअरचे मुख्य उत्पादन अधिकारी एम.ए. पार्थसारथी यांनी सांगितले की, भारतात ई-वाणिज्य जगातील अन्य देशांच्या तुलनेत अधिक गतिमान असल्याचे दिसून येते. मोबाइल प्रणालीच्या प्रसारामुळे हे घडून आले आहे. बहुतांश ग्राहक इंटरनेटवर कपडे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मुले आणि पाळीव प्राण्यांशी संबंधित उत्पादने खरेदी करण्यासाठी मोबाइल फोनचा वापर करीत असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. मोबाइलवर जास्तीतजास्त खरेदी ही नेहमीच्या वापरातील वस्तूंची, तसेच भावनेच्या भरात खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तूंची होते. महागड्या वस्तू कमी प्रमाणात खरेदी केल्या जातात. मोबाइलवरून होणाऱ्या आॅनलाइन खरेदीपैकी ९0 टक्के खरेदी संगीत आणि चित्रपटांशी संबंधित वस्तूंची होते. याउलट ३६ टक्के लोक विमा आणि त्यासारख्या अन्य उत्पादनांच्या खरेदीसाठी पर्सनल कॉम्प्युटरचा अथवा लॅपटॉपचा वापर करतात.
आॅनलाइन खरेदीला ग्राहकांची अधिक पसंती
By admin | Published: May 21, 2016 5:25 AM