एस.के. गुप्ता
नवी दिल्ली : इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने देशातील कोरोना साथीचा फैलाव व या आजाराशी मुकाबला करण्यासाठी लोकांमध्ये असलेली प्रतिकारशक्ती यांचा अभ्यास करण्यासाठी ८३ जिल्ह्यांतील २६,४०० लोकांचे सिरॉलॉजिकल सर्वेक्षण केले. देशामध्ये कोरोनाशी लढा देण्यासाठी आणखी काही काळ लॉकडाऊन सुरू ठेवावा अशी शिफारस आयसीएमआरने या सर्वेक्षणातील निष्कर्षांच्या आधारे केली आहे. या सर्वेक्षणासाठी पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजीने कोरोना चाचणीसाठी बनविलेल्या एलिसा कीटचा वापर करण्यात आला. शरीरात विषाणूंशी लढण्यासाठी असलेल्या अँटीबॉडीजबद्दल या चाचणीतून माहिती मिळते.
आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, कोरोनाशी देशाला अजून अनेक महिने सामना करावा लागणार आहे हे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला व दहा वर्षांपेक्षा कमी वयाची मुले यांना कोरोना साथीपासून मोठा धोका आहे. कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही हे त्यासंदर्भातील चाचणीतून लक्षात येते. संसर्गाशी लढण्याकरिता शरीरातील अँटीबॉडीज मदत करतात.भार्गव यांनी सांगितले की, देशातील हॉटस्पॉट असलेल्या शहरांतील एक तृतीयांश लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. अनेक रुग्ण कोणतेही उपचार न घेता बरे झाले आहेत. त्यांच्या शरीरातून तशा प्रभावी अँटीबॉडीज सर्वेक्षणादरम्यान मिळाल्या आहेत. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत कंटेनमेंट क्षेत्रात साथीचा झालेला फैलाव १०० ते २०० पट अधिक आहे. मुंबई, इंदूरसारख्या शहरांमध्ये ही स्थिती आहे. म्हणजे जितके रुग्ण आढळून आले, त्याच्या पेक्षा न सापडलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे.इतरांच्या तुलनेत मृत्यूदर कमीकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, देशात कोरोना रुग्णांपेक्षा या आजारातून बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतात कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. देशात प्रत्येक एक लाखांमागे ०.५९ इतकाच मृत्यूदर आहे.नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, आयसीएमआरने मे महिन्याच्या तिसºया आठवड्यात कोरोना स्थितीसंदर्भात सिरॉलॉजिकल सर्वेक्षण केले होते. लॉकडाऊन लागू झाल्यानंतरच्या पाच आठवड्यापर्यंत म्हणजे ३० एप्रिलपर्यंत कोरोना रुग्णांच्या शरीरातील अँटीबॉडीजच्या स्थितीची माहिती या सर्वेक्षणातून उपलब्ध झाली आहे.अनेक लोकांची प्रतिकारशक्ती उत्तम आहे. त्यामुळे कोरोनाची लागण होऊनही त्यांचा आजार कोणतेही उपचार न घेता आपोआप बरा झाला. कोरोनाचा मोठा फैलाव झालेल्या भागांत १५ ते ३० टक्के लोक या आजाराने ग्रस्त आहेत.