मुंबई : सध्या अनेक चित्रपटांना प्रदर्शनाआधीच ग्रहण लागलंय. केवळ सेन्सॉर बोर्डाचंच नव्हे तर सरकारनेही कोणता चित्रपट नागरिकांना पहावा आणि कोणता नाही यावर भाष्य करायला सुरुवात केलीय. चित्रपट, त्यांचे विषय आणि त्यांची नावं यावरुन कॉन्ट्रोव्हर्सी होणं, तसं काही इंडस्ट्रीला नवीन नाही. एकंदरीत मराठीतील न्यूड आणि दशक्रिया, हिंदीतील पद्मावती तामिळमधील एस.दुर्गा (सेक्सी दुर्गा) आणि या चित्रपटांविरोधात ज्याप्रकारे विरोध केला जातोय त्याप्रमाणे कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच गदा येतेय असा मतप्रवाह कलाकारांमध्ये येऊ लागलाय. एकदा दादा कोंडके म्हणाले होते की, ‘चित्रपटाचं उत्तम मार्केटींग चित्रपटाच्या वादातच ठरलेलं आहे.’ त्यांचेही अनेक चित्रपट वादग्रस्त ठरेल होते, पण त्या वादग्रस्त ठरलेल्याच चित्रपटांनी अधिक गल्ला जमवला होता. खरंतर या इंडस्ट्रीत ‘निगेटीव्ह पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी’. आताही परिस्थिती थोड्याफार प्रमाणात तशीच आहे. आजपर्यंतचा असा रेकॉर्ड आहे की वादग्रस्त ठरलेले चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांना तुफान प्रतिसाद मिळालाय. त्यामुळे न्यूड, दशक्रिया, एस.दुर्गा आणि पद्मावती (प्रदर्शित झाले तर) यांनाही प्रेक्षकवर्ग मोठा प्रतिसाद देतोय का हे पाहणं गरजेचं ठरेल. याचनिमित्ताने वादग्रस्त ठरलेले आणि नंतर बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला कमवणारे काही चित्रपट आपण पाहुया.
उडता पंजाब (२०१६)
२०१६ साली प्रदर्शित झालेला उडता पंजाब हा चित्रपट चांगलाच गाजला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर पंजाब राज्याची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता असल्याने या चित्रपटात सेन्सॉर बोर्डाने जवळपास ८९ कट्स सुचवले होते. त्यानंतर अनुराग कश्यप यांनी हा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात नेला आणि केवळ १ कट सुचवून चित्रपट प्रदर्शित करण्याची मान्यता मिळाली. ४० कोटीच्या या चित्रपटाने जगभरातून ९९ कोटींचा गल्ला जमवला.
लिपस्टीक अंडर माय बुरखा (२०१७)
स्त्रीप्रधान असलेला चित्रपट लिपस्टिक अंडर माय बुरखा हादेखील खूप काळ वादात अडकला होता. यामध्ये अवास्तव संकल्पना रंगवण्यात आल्याचा ठपका सेन्सॉर बोर्डाने केला होता. त्याचप्रमाणे विवादास्पद प्रणयदृश्ये आणि शिवीगाळ असल्याच्या कारणावरुन हा चित्रपट बराच वादात सापडला होता. जवळपास 6 महिने हा वाद रंगला. अखेर यावर्षी जुलै महिन्यात तो प्रदर्शित झाला. सुरुवातीपासून हा चित्रपट फक्त स्त्रीप्रधान असल्याने भारतातील फेमिनिस्ट या चित्रपटाकडे लक्ष ठेवून होत्या. चित्रपट प्रदर्शित होताच महिलावर्गाने तर या चित्रपटाची प्रशंसा केलीच शिवाय अनेक सिनेसमिक्षक, कलावंत आणि मान्यवरांनीही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला. 18 कोटींची कमाई या सिनेमाने मिळवून दिली.
पी.के (२०१४)
आमिर खानच्या पी.के चित्रपटातून हिंदू धर्माची अवहेलना होत असल्याचा आरोप करत या चित्रपटावरही बरीच वादावादी झाली होती. त्यावेळी अनेक संघटनांनी या चित्रपटाला विरोध दर्शवला होता. साहजिकच हा विरोध चित्रपटाच्या मार्केटींगसाठी बराच उपयोगी ठरला. आमिर खानवरचं प्रेम आणि चित्रपटाची होणारी एकंदरीत निगेटीव्ह पब्लिसिटी पाहता चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बरीच रक्कम गोळा केली. चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात १७५ कोटींचा गल्ला जमावला तर एकूण ८३२ कोटी कमवण्यात या चित्रपटाला यश आलं.
बाजीराव मस्तानी (२०१५)
२०१५ साली प्रदर्शित झालेला बाजीराव मस्तानीसुद्धा चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. यातील पिंगा आणि मल्हारी हा दोन्ही गाणी हटवण्यात यावी अशी मागणी पेशवे घराण्याचे वशंज उदयसिंह पेशवे यांनी केली होती. काशीबाई आणि मस्तानी कधीच एकत्र नाचल्या नव्हत्या त्यामुळे या दोघींवर चित्रीत झालेलं गाणं म्हणजे इतिहासाचं विकृतीकरण असल्याचं त्यांच्या वारसांकडून सांगण्यात आलं होतं. तसंच अनेक इतिहास अभ्यासकांनीही या गाण्यावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होईल की नाही यावरच शंका उपस्थित झाली होती. सुदैवाने हा चित्रपट २०१५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. हा सगळा वाद चित्रपटाच्या मार्केटींगसाठीही तितकाच उपयोगी पडला. कारण तब्बल ३५० कोटी या चित्रपटाने कमावले. एवढंच नव्हे तर अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही या चित्रपटाला मिळाले. त्यामुळे या चित्रपटावर कितीही वाद झाले असले तरीही प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरभरून प्रेम केलं असंच म्हणता येईल.
ए दिल है मुश्कील (२०१६)
पाकिस्तानी कलाकार चित्रपटात घेतल्याने हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. देशभरातून पाकिस्तानी कलाकारांविरोधात सगळ्यांनी बंड उगारले होते. भारतात कलाकार असूनही आणि भारत-पाकिस्तान यांच्यात सिमेवर युद्ध सुरू असूनही निर्माते पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात कसे घेतात यावरून हा वाद उफाळला होता. आता चित्रपट प्रदर्शित होऊ द्या, पुढच्या वेळेस अशी चुक होणार नाही या एका अटीवर या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने जगात १३८ कोटी रुपये कमवले. शाहरुख खानच्या रईसमध्येही पाकिस्तानी अभिनेत्री माहीरा खानवरुन टीकेची झोड उठली होती. मग तिला चित्रपटाच्या प्रमोशनमधून वगळण्यात आलं.
झेंडा (२००९)
अवधुत गुप्ते यांचा झेंडा हा चित्रपट राजकीय पार्श्वभूमीवर असल्याने त्यावेळी यावर बराच आक्षेप करण्यात आला होता. शिवसेनाप्रमुखांकडून या चित्रपटाची समंती मिळाली मात्र नंतर स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनीही या चित्रपटावर डाग तोफली. चित्रपटातील मालवणकर व्यक्तिरेखेमुळे मालवणकरांची पर्यायाने राणेंची प्रतिमा खराब होईल असं सांगण्यात आलं. हा राजकिय चित्रपट असल्याने एवढा विरोध होणार हे साहजिकच होतं. त्यामुळे सगळ्यांची मनधरणी करून गुप्तेंना चित्रपटातील खुप सारे सीन कट करावे लागले होते. अखेर २२ जानेवारी २०१० साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यामुळे आयुष्यात पुन्हा कधीच राजकिय चित्रपट बनवणार नसल्याची शपथच अवधुत गुप्ते यांनी घेतली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २ कोटींचा गल्ला जमवला.
शिक्षणाच्या आयच्या घो (२०१० जानेवारी)
महेश मांजरेकर निर्मित शिक्षणाच्या आयचा घो हा चित्रपट नावामुळेच वादात सापडला होता. शिक्षणासारख्या विषयावरील चित्रपटाचे असे नाव असू नये, हे नाव अत्यंत अश्लाघ्य असल्याचं शैक्षणिक क्षेत्रातील मंडळींनी सांगितलं होतं. मात्र शिक्षणावर आपला आक्षेप नसून शिक्षण पद्धतीवर आपला आक्षेप असून त्याचा विचार करूनच आम्ही असं नाव ठेवलं आहे, अशी स्पष्टोक्ती महेश मांजरेकर यांनी दिली. अखेर सगळ्यांनी या चित्रपटाला मान्यता दिल्यावर १० जानेवारी २०१० साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने ३.५ कोटी जमवण्यात यश मिळवले.
अजिंठा (२०१२)
नितिन चंद्रकांत देसाई यांच्या अंजठा चित्रपटालाही वादाची फोडणी मिळाली होती. या चित्रपटातून वंजारा समाजाची अवहेलना झाल्यामुळे हा वाद पेटला होता. वाद शमल्यानंतर समिक्षकांनी या चित्रपटाची बरीच वाहवा केली होती. प्रेक्षकांच्याही पसंतीस हा चित्रपट उतरला होता. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी एका परदेशी अभिनेत्यासोबत दिसली होती. तिच्याही अभिनयाची प्रशंसा झाली.
मराठी टायगर्स (२०१६)
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर असलेला ‘मराठी टायगर्स’हा मराठी चित्रपटही वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. हा चित्रपट कर्नाटकात प्रदर्शित करण्यात येऊ नये, असा फतवा कर्नाटक शासनाने काढला होता. मात्र नंतर वाद मिटला आणि सिनेमा प्रदर्शित झाला. १.३४ कोटी या चित्रपटाने कमवले.
न्यूड (२०१७)
रवी जाधव यांचा न्यूड हा चित्रपट इफ्फी महोत्सवातून बाहेर काढला. या चित्रपटाला इफ्फीच्या ओपनींग स्क्रिनींगचा मान मिळाला होता. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी आनंदात होती. मात्र ज्यूरींनाही न सांगता माहिती व प्रसारण मंत्रालयाने या चित्रपटाला बाहेरचा रस्ता दाखवला आणि वाद सुरू झाला. त्यामुळे यावर रवी जाधव आणि एकंदरीत मराठी चित्रपटसृष्टी काय पावलं उचलेल हे पाहणं गरजेचं आहे.
दशक्रिया (२०१७)
आज प्रदर्शित झालेला अॅव़ॉर्ड विनिंग दशक्रिया हा चित्रपट प्रदर्शनाआदीच वादाच्या भोवऱ्यात अडकला. ब्राम्हण समाजाने या चित्रपटावर आक्षेप घेतला असून या चित्रपटातून ब्राम्हण समाजाची अवहेलना होत असल्याचा ब्राम्हण समाजाचा आरोप आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये याकरता मागणी करण्यात आली होती. मात्र हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे.