नवी दिल्ली : भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना बंदुकीचा परवाना मिळाला आहे. प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्यावर केलेल्या टिप्पणीवरून झालेल्या नाराजीनंतर त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. ठार मारण्याच्या धमक्या येत असल्याने त्यांनी बंदूक परवान्यासाठी अर्ज केला होता.
दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने गुरुवारी याला दुजोरा दिला. २०२२ च्या मध्यात, नूपुर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीच्या चर्चेत प्रेषित मोहंमद पैगंबरांबद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय वादळ निर्माण झाले होते. पक्षाने त्यांना निलंबित केले होते. नूपुर शर्मा यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी देशात अनेक भागांत हिंसक निदर्शने झाली होती. दरम्यान, नूपुर शर्मा यांनी त्यांची टिप्पणी परत घेताना आपला कोणत्याही धार्मिक भावना दुखावण्याचा विचार नव्हता, असा खुलासा केला होता.
न्यायालयानेही ओढले होते ताशेरे
जुलै २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही देशभरातील वातावरण बिघडवल्याबद्दल नूपुर शर्मांवर ताशेरे ओढले होते. दरम्यान, नूपुर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडिया पोस्ट टाकणाऱ्या अमरावतीमधील ५४ वर्षीय औषध विक्रेत्याची हत्या झाली होती. त्यानंतर अशा अनेक घटना घडल्या होत्या.