ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 3 - अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याचा आरोप असलेले उत्तर प्रदेश सरकारमधील वादग्रस्त मंत्री गायत्री प्रजापती परदेशात पळण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आले असून, या वृत्तानंतर देशभरातील विमानतळांवर आणि एक्झिट पॉइंटवर अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर गायत्री प्रजापती यांच्यासह सहा जणांविरोधात सामुहिक बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. उत्तर प्रदेशमध्ये पाचव्या टप्प्यात झालेल्या मतदानात अमेठी येथे मतदान केल्यानंतर गायत्री प्रजापती हे गायब झाले, तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या प्रकरणी प्रथमच मौन सोडताना सांगितले की, "या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली होत असून, उत्तर प्रदेश सरकार राज्य पोलिसांना त्यासाठी योग्य सहकार्य करत आहे." मात्र यावेळी अखिलेश यांनी गायत्री प्रजापती यांचा बचावही केला. बदायूँसारख्या प्रकरणात आरोपांपेक्षा सत्य वेगळेच असल्याचे समोर आले होते, असे त्यांनी सांगितले. तर प्रजापती यांना अखिलेश यांच्या घरात लपवून ठेवल्याचा आरोप भाजपाने केला आहे.