नवी दिल्ली : उत्तर प्रदेश काँग्रेसचे नेते अजय राय यांनी सोमवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान केले. त्या (इराणी) आपला मतदारसंघ अमेठीत फक्त 'लटके झटके' दाखवण्यासाठी येतात, असे विधान अजय राय यांनी केले. यानंतर स्मृती इराणी यांनी अजय राय यांच्यावर निशाणा साधला आहे. यासंदर्भात स्मृती इराणी यांनी ट्विट केले आहे.
स्मृती इराणी म्हणाल्या की, "राहुल गांधी, तुम्ही तुमच्या एका प्रांतीय नेत्याकडून 2024 मध्ये अमेठीतून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे, असे ऐकले आहे. त्यामुळे तुम्ही अमेठीतून निवडणूक लढवणार, हे निश्चित समजू का? तुम्ही दुसऱ्या जागेवर पळणार नाही ना? घाबरणार नाही ना?' तुम्हाला आणि मम्मीजींना तुमच्या दुष्ट गुंडांसाठी एक नवीन स्पीच रायटर मिळायला हवा."
दरम्यान, अजय राय यांच्या या विधानावर भाजप नेत्यांनी कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर प्रदेश भाजपचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी लखनौमध्ये सांगितले की, ज्या पक्षाने देशाला महिला पंतप्रधान दिले आहे, त्या पक्षाच्या नेत्याची अशी टिप्पणी निश्चितच लाजिरवाणी आहे. काँग्रेस नेत्यांकडून वापरली जाणारी भाषा नेहमीच महिलाविरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला.
काय म्हणाले होते अजय राय?उत्तर प्रदेश काँग्रेसचे नेते अजय राय यांनी पत्रकारांशी बोलताना ही वादग्रस्त टिप्पणी केली. त्यांना राहुल गांधींच्या 2024 ची लोकसभा निवडणूक अमेठीतून लढवण्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला होता. यावर अजय राय म्हणाले, "ही (अमेठी) गांधी घराण्याची जागा आहे. राहुलजी तेथून लोकसभेचे सदस्य आहेत. राजीव (गांधी) आणि संजय (गांधी) जी यांनीही या क्षेत्राची सेवा केली आहे."
याचबरोबर, अजय राय म्हणाले, "तुम्ही आता पाहत असलेले बहुतेक कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जगदीशपूर औद्योगिक क्षेत्रातील निम्मे कारखाने बंद पडले आहेत. स्मृती इराणी इथे येतात, 'लटके-झटके' दाखवतात आणि निघून जातात. जागा (अमेठी) नक्कीच गांधी घराण्याची आहे आणि तशीच राहील. तेथील कार्यकर्त्यांची आणि आपल्या सर्वांची मागणी आहे की, त्यांनी (राहुल गांधी) 2024 ची लोकसभा निवडणूक तिथून (अमेठी) लढवावी." दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव केला होता.