बडोदा : पुलवामामध्ये आत्मघाती हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांवरून गुजरातमधीलभाजपाचे नेते आणि प्रवक्ते भरत पंड्या यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्यामुळे देशात 'देशभक्तीचे वारे वाहू लागले आहेत, त्याचा मतांसाठी फायदा उठवा', असा आदेशच त्यांनी कार्यकर्त्यांना एका सभेवेळी दिला आहे. भाजपाकडून आयोजित कार्यकर्ता संवाद शिबिरामध्ये ते सोमवारी बोलत होते.
पंड्या पुढे म्हणाले, की काश्मीरमध्ये जो हल्ला झाला...तुम्ही सर्वांनी त्याचे व्हिडिओ, फोटो पाहिले असतील. देशातील लोक सर्व मतभेद दूर करून राष्ट्रभक्तीमुळे एकत्र आलेत. या लोकांनी रॅली आणि आंदोलने करून देशाप्रती असलेले प्रेम दाखविले आहे. मनमोहन सरकारच्या वेळी मुंबईमध्ये हल्ला झाला होता तेव्हा कसे वातावरण होते? संसदेत कशाप्रकारे मुद्दा उठविण्यात येत होता. त्यावेळी अशी चर्चा होती की हल्लेखोर दहशतवाद्यांना स्थानिक पातळीवर मदत मिळत आहे. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात होती. मात्र, आज स्थिती बदलली आहे.
पंड्या पुढे म्हणाले, पुलवामामध्ये याआधीही अनेक हल्ले झाले आहेत. देशातील लोक रात्रंदिवस हेच पाहत आहेत की, भारताकडून पाकिस्तानवर काय कारवाई केली जातेय. देशात आज ही भावना आहे. पूर्ण देश राष्ट्रभक्तीच्या भावनेत आहे. या एकतेला मतांमध्ये परिवर्तीत करण्याची जबाबदारी आपली आहे.
याशिवाय त्यांनी कार्यकर्त्यांना बोलताना सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला आहे. पक्षाची प्रतिमा मलिन होईल असे शब्द वापरू नयेत. तुमचे शब्द औषधासारखे असायला हवेत असेही त्यांनी सांगितले.