2014 पासून भारत अमेरिकेचा गुलाम, काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांचे वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 09:56 AM2021-11-23T09:56:51+5:302021-11-23T09:57:06+5:30
अभिनेत्री कंगना राणौतनंतर आता काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी देशाच्या स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतनंतर आता काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर(Mani Shankar Aiyar) यांनी देशाच्या स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. इंडो-रशिया फ्रेंडशिप सोसायटीच्या एका कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अय्यर म्हणाले की, 2014 पासून आपण अमेरिकेचे गुलाम झालो आहोत. अय्यर यांनी आपल्या भाषणात भारत-रशिया संबंधांचा उल्लेख करुन आपल्या विधानाला सार्थ ठरवण्याचा प्रयत्न केला.
आपण अमेरिकेचे गुलाम झालोत
माजी केंद्रीय मंत्री अय्यर पुढे म्हणाले की, 'अमेरिकेसोबत तणाव होता, पण मॉस्कोसोबतचे आमचे संबंध कधीही इतके तणावपूर्ण नव्हते. भाजपचे सरकार आल्यापासून परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. गेल्या 7 वर्षात आपण पाहत आहोत की, गुटनिहाय चर्चा होत नाही, शांततेची चर्चा होत नाही. आपण आज अमेरिकन गुलाम बनून बसलो आहोत. भारत आणि रशियाचे संबंध जुने आहेत, मात्र मोदी सरकार आल्यापासून हे नाते कमकुवत झाले आहे. 2014 पासून आपले रशियाशी असलेले संबंध खूपच कमी झाले आहेत.'
उझबेकिस्तानमधील अनेक मुलींचे नाव 'इंदिरा'
तु पुढे म्हणाले, 'रशिया नेहमीच आमच्या पाठीशी उभा राहिला आहे. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या प्रयत्नांमुळे रशियाचे आपल्याशी असलेले संबंध सर्वच बाबतीत दृढ झाले होते. तेव्हा इंदिरा हे रशियन नाव झाले होते. अनेक मुलींचे नाव इंदिरा ठेवण्यात आले आणि हे सर्वात जास्त उझबेकिस्तानमध्ये घडले. स्वातंत्र्याच्या 8 वर्षानंतर म्हणजे 1955 पासून भारत-रशिया यांच्यातील संबंधांमध्ये सातत्याने प्रगती होत असली तरी गेली 7 वर्षे आपण अमेरिकेचे गुलाम बनून बसल्याचे पाहायला मिळत आहे.