नवी दिल्ली – विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित बनलेली ‘द काश्मीर फाइल्स’ हा सिनेमा सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार या सिनेमात दाखवण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने लोकं चित्रपटगृहात हजेरी लावत आहेत. हरियाणासह काही राज्यांनी या सिनेमावरील टॅक्स माफ केला आहे. परंतु याचवेळी केरळ काँग्रेसनं सिनेमावर टीकास्त्र सोडलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये पंडितांपेक्षा मुस्लीम जास्त मृत्युमुखी पडलेत असं त्यांनी म्हटलं.
काश्मिरी पंडितांपेक्षा मुस्लीम जास्त मारले
केरळ काँग्रेसनं ट्विट करत सांगितले की, ज्यांनी काश्मिरी पंडितांना निशाना बनवलं ते दहशतवादी होते. १९९० ते २००७ या १७ वर्षाच्या काळात दहशतवादी हल्ल्यात ३९९ पंडितांची हत्या झाली. याच काळात दहशतवाद्यांनी १५ हजार मुस्लिमांची हत्या केली होती. काश्मीर खोऱ्यातून काश्मीर पंडितांचं पलायन तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांच्या निर्देशावर झाले होते. ते आरएसएस विचारसरणीचे होते असंही काँग्रेसनं म्हटलं आहे.
काँग्रेसनं केली काश्मीर पंडितांना मदत
त्यासोबतच काश्मीर पंडितांचे पलायन भाजपा पुरस्कृत वीपी सिंह सरकारच्या काळात सुरू झालं. भाजपा समर्थनात वीपी सिंह सरकार डिसेंबर १९८९ मध्ये सत्तेत आले होते. पंडितांचे पलायन त्याच्या १ महिन्यानंतर सुरू झालं. भाजपानं त्यावर काहीच केले नाही. नोव्हेंबर १९९० पर्यंत वीपी सिंह सरकारला भाजपाने समर्थन दिले. यूपीए सरकारनं जम्मूमध्ये काश्मीर पंडितांसाठी ५२४२ घरं बनवली. त्याशिवाय पंडितांच्या कुटुंबाला ५ लाख रुपये आर्थिक मदत केली. कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आणि शेतकऱ्यांना कल्याणकारी योजनेत समाविष्ट केले.
वादानंतर ट्विट हटवलं
काँग्रेसकडून करण्यात आलेल्या ट्विटनंतर सोशल मीडियात यूजर्सनं काँग्रेसविरोधात विविध प्रतिक्रिया दिल्या. लोकांनी काँग्रेसला प्रश्न विचारले. त्यानंतर केरळ काँग्रेसनं हे ट्विट डिलीट केले. १९९० आधी काश्मीरमध्ये सर्वकाही सुरळीत सुरू असल्यासारखं काँग्रेस म्हणत आहे असा सवाल यूजर्सने केला. द काश्मीर फाइल्स हा सिनेमा लोकांच्या पसंतीस येत आहे. ११ मार्चला रिलीज झालेल्या या सिनेमात अनुपम खेर, पल्लवी जोशी एवं मिथुन चक्रवर्ती यांनी अभिनय केला आहे.