ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 12 - प्रसिद्ध अर्थतज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांच्यावर बनवण्यात आलेल्या माहितीपटाच्या प्रदर्शनात अडथळे निर्माण झाले आहेत. सेन्सॉर बोर्डाने डॉक्युमेंट्रीचे निर्माते सुमन घोष यांना डॉक्युमेंट्रीमधील गुजरात, गाय, हिंदुत्व आणि हिंदू इंडिया हे शब्द म्युट करण्याची सूचना केली आहे. पण सुमन घोष यांनी सेन्सॉर बोर्डाच्या सूचनांचे पालन करण्यास नकार दिला आहे.
आपण एकही शब्द म्युट करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे तूर्तास तरी ही डॉक्युमेंट्री प्रदर्शित होऊ शकणार नाही. "द टेलिग्राफ"ने हे वृत्त दिले आहे. घोष यांनी मंगळवारी सीबीएफसीच्या कार्यालयात "द आरग्युमेंटीव्ह इंडियन" ही डॉक्युमेंट्री दाखवली त्यावेळी त्यांना गुजरात, गाय, हिंदू हे शब्द म्युट करुन यूए प्रमाणपत्र घ्या, तरच चित्रपट प्रदर्शित करता येईल असे सांगण्यात आले.
लोकशाही देशामध्ये सरकारवर केलेल्या टीकेची अशा प्रकारे तपासणी होणे धक्कादायक आहे. डॉक्युमेंट्रीमधील काही शब्द बीप किंवा म्युट करण्याची मागणी मी अजिबात मान्य करणार नाही असे सुमन घोष यांनी सांगितले. 2002 आणि 2017 अशा दोन भागात "द आरग्युमेंटीव्ह इंडियन" ही डॉक्युमेंट्री चित्रीत करण्यात आली आहे. कॉर्नेल विद्यापीठामध्ये व्याख्यान देताना सेन यांनी गुजरातचा उल्लेख केला होता.
आणखी वाचा
प्रसारमाध्यमांशी बोलताना घोष यांनी सेन्सॉर बोर्डाच्या सूचनांवर जोरदार टीका केली आहे. डॉक्युमेंट्रीमध्ये सेन गुजरात दंगलीसंबंधी बोलत आहेत त्यातील गुजरात शब्द मला म्युट करायला सांगितलाय. त्यानंतर गाय शब्द म्युट करण्याची सूचना आहे. माझ्या दृष्टीने अशा सूचना म्हणजे विनोद आहे. हिंदू, हिंदुत्व हे शब्द सुद्धा म्युट करायला सांगितले त्यावर माझा तीव्र आक्षेप आहे. सेन्सॉर बोर्डाच्या आदेशामुळे उडता पंजाब, लिपस्टिक अंडर माय बुरखा हे चित्रपट वादग्रस्त ठरले. चित्रपटांचा नियम डॉक्युमेंट्रीला लावला जाईल असे मला वाटले नव्हते असे सुमन घोष यांनी सांगितले. येत्या शुक्रवारी कोलकातामध्ये हा माहितीपट प्रदर्शित होणार होता.
अमर्त्य सेन यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विरोधक म्हणून पाहिले जाते. 2014 लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असताना त्यांनी मोदींवर टीका केली होती. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना आपल्याला देशाचे पंतप्रधान म्हणून पहायला आवडणार नाही असे वक्तव्य करुन त्यांनी मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला तेव्हा विरोध केला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयावरही त्यांनी आसूड ओढले होते. नोटाबंदी म्हणजे मोठी चूक असल्याचे त्यांनी म्हटले होते.