‘जादू की झप्पी’चा वाद, राहुल यांच्या कृतीला पाठिंबा आणि विरोधही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 06:35 AM2018-07-21T06:35:54+5:302018-07-21T06:36:45+5:30
संसदेत अविश्वास ठरावावरील चर्चेवेळी नवा वाद निर्माण झाला.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : संसदेत अविश्वास ठरावावरील चर्चेवेळी नवा वाद निर्माण झाला. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाषण संपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळ जाऊ न त्यांना आलिंगन दिले, पण त्यांच्या या ‘जादू की झप्पी’बद्दल अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी नापसंती व्यक्त केली. मोदी, रा. स्व. संघ व भाजपाचे आपण आभारच मानतो, असे उपरोधिकपणे म्हणताना, त्यांच्यामुळेच आपणास भारतीय असणे काय असते, हे समजू शकले, असा टोला राहुल गांधींनी लगावला. तुमच्या मनात माझ्याविषयी राग आहे, तुम्ही मला पप्पू म्हणता, शिव्या देता, असे असूनही माझ्या मनात तुमच्याविषयी क्रोध वा द्वेष नाही. कारण मी काँग्रेसी आहे. काँग्रेसमध्ये क्रोध, द्वेषाला जागाच नाही. आम्ही भाजपांमध्येही प्रेमाचे वातावरण निर्माण करू आणि तुम्हाला काँग्रेसी बनवू, या शब्दांत भाषण संपवून राहुल पंतप्रधानांच्या स्थानापाशी गेले. ते का आले, हे मोदींना लक्षात आले नाही. तोपर्यंत राहुल यांनी मोदींना मिठी मारली आणि लगेच निघाले.
गृहमंत्री राजनाथ सिंह ठरावावर बोलण्यासाठी उभे राहिले, तेव्हा त्यांनी राहुल यांच्या कृतीवर कठोर टिप्पणी केली. अकाली दलाच्या हरसिमरत कौर व भाजपाच्या किरण खेर यांनीही राहुल गांधी यांच्या कृतीवर नापसंती व्यक्त केली.
फारुख अब्दुल्ला यांच्यासह विरोधी पक्षांच्या अनेक संसद सदस्यांनी राहुल गांधी यांची ही कृती योग्य असल्याचे सांगत, स्पष्ट एकूणच राहुल यांच्या ‘प्यार की झप्पी’ची दिवसभर संसदेत व सोशल मीडियावरही चर्चा होती.