कमळच का? मोर, वाघ का नाही? विरोधकांचा सवाल; संसद कर्मचाऱ्यांच्या नव्या गणवेशावरून राजकारण तापलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 10:16 PM2023-09-12T22:16:23+5:302023-09-12T22:20:36+5:30
टागोर म्हणाले, 'केवळ कमळच का? मोर अथवा वाघ का नाही? हे भाजपचे निवडणूक चिन्ह नाही. ओम बिर्ला जी, ही घसरण का?
आता संसद कर्मचाऱ्यांच्या नव्या गणवेशावरून राजकारण तापताना दिसत आहे. त्यांच्या नव्या गणवेशावर कमळाची फुले छापण्यात आल्याच्या वृत्तावरून काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी सत्ताधारी भाजपव निशाणा साधला आहे. भाजप संसदेला एका पक्षाचे व्यासपीठ बनवत आहे. राष्ट्रीय प्राणी आणि राष्ट्रीय पक्षी अनुक्रमे वाघ आणि मोर आहेत. मग या ऐवजी केवळ 'कमळ'च का दर्शवले जात आहे, असा सवाल टागोर यांनी केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करताना टागोर म्हणाले, 'केवळ कमळच का? मोर अथवा वाघ का नाही? हे भाजपचे निवडणूक चिन्ह नाही. ओम बिर्ला जी, ही घसरण का?
माध्यमांतील वृत्तांनुसार, संसदेतील कर्मचाऱ्यांसाठी नवा गणवेश लागू होणार आहे आणि या गणवेशावर कमळाची फूले छापण्यात आली आहेत. यासंदर्भात बोलताना मणिकम टागोर म्हणाले, 'संसदेतील कर्मचाऱ्यांच्या वर्दीवर भाजपचे निवडणूक चिन्ह आहे. त्यांनी जी20 मध्येही असेच केले होते. हे लोक आता पुन्हा असेच करत आहेत आणि सांगत आहेत की, हे राष्ट्रीय फूल आहे.'
याशिवाय, 'संकुचित विचार योग्य नाही. आशा आहे की, भाजप या यासर्वांच्या वर येईल आणि संसदेला एकपक्षीय व्यासपीठ करणार नाही. हे दुर्दैवी आहे. संसद सर्व पक्षांच्या वर आहे. यावरून स्पष्ट होते की, भाजप प्रत्येक संस्थेत हस्तक्षेप करत आहे', असे मणिकम टागोर यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात, राष्ट्रवादी काँग्रेसनेही केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. एनसीपी प्रवक्ता क्लाइड क्रॅस्टो म्हणाले, संसदेतील कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर कमळाचे चन्ह छापून भाजप आपल्या लोकशाहीच्या मदिराला राजकीय क्षेत्र बदलू इच्छीत आहे. भाजप आपल्या प्रचारासाठी संसदेचा दुरुपयोग करत आहे.
संसदेतील कर्मचाऱ्यांच्या गणवेशात मोठे बदल -
संसदेच्या 5 दिवसांच्या विशेष अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारने संसद कर्मचाऱ्यांसाठी 'भारतीय टच' असलेला नवा गणवेश लाँच केला आहे. यात कर्मचाऱ्यांसाठी माजंता अथवा गडद गुलाबी रंगाच्या नेहरू जॅकेटचा समावेश आहे. यापूर्वी ते संसदीय कामकाजादरम्यान बंदगळ्याचा सूट घालायचे. याच बरोबर, शर्टमध्येही बदल करण्यात आला आहे. ते आता कमळाच्या फुलांचे चिन्ह असलेले गडद गुलाबी रंगांचे शर्ट आणि खाकी रंगाची पँट परिधान करतील. याशिवाय, दोन्ही सभागृहांच्या मार्शलचा गणवेशही बदलण्यात आला आहे. आता ते मणिपुरी पगडी घालतील. याशिवाय, संसदेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गणवेशही बदलण्यात येणार आहे. ते सफारी सूटऐवजी, काहीशा लष्करासारख्या ड्रेसमध्ये दिसतील.