ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - काश्मीरमध्ये हिंसाचार माजवण्यात आघाडीवर असलेल्या लष्कर ए तोयबा या कुख्यात दहशतवादी संघटनेचे म्होरके हाफिझ सईद आणि जकी उर रेहमान लखवी यांच्यात वाद उफाळला आहे. काश्मीरमध्ये कशा पद्धतीने हिंसाचार माजवायचा यावरून दोघांमध्येही मतभेद असल्याचे वृत्त आहे. लष्करचे दहशतवादी काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची हत्या करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे भारताच्या सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. भारताच्या गुप्तहेर संघटनांच्या रिपोर्टमध्ये सईद आणि लखवीमध्ये काश्मीरमध्ये दहशतवाद माजवण्याच्या पद्धतीवरून वाद झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
हिंदुस्तान टाइम्स ने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले आहे. या वृत्तानुसार 26/11च्या मुंबईवरील हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जकी उर रेहमान लखवी आणि हाफिझ सईद यांच्यात काही मुद्यांवरून वाद सुरू आहेत. मात्र या दोघांमधील मतभेदांचे नेमके कारण समजू शकलेले नाही. काही दिवसांपूर्वीच वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानने हाफिझ सईदला नजरकैदेत ठेवले आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार लष्कर ए तोयबा भारतात मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी लखवीने आपला मर्जीतील लोकांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये दाखल होण्यास सांगितले आहे. मात्र भारतात होणाऱ्या हल्ल्यांमध्या आपले नाव येऊ नये असा लष्करचा प्रयत्न आहॆ. त्याऐवजी काश्मीर सोडा आंदोलन या नावाने प्रसिद्धीपत्रक काढून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्याचा लष्कराचा मानस आहे.
त्याबरोबरच खोऱ्यातील काही फुटीरतावादी नेत्यांची हत्या करून काश्मीरमध्ये हिंसा भडकवण्याचे छडयंत्रही लष्करकडून रचले जात आहे. त्याबरोबरच तहरिक ए मुजाहिद्दीन या संघटनेने स्वत:ला पुन्हा एकदा संघटित केले आहे. हीच संघटना फुटिरतावादी नेत्यांची हत्या करून काश्मीरमध्ये अशांतता माजवण्याची शक्यता आहे.