गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे हिमाचल प्रदेशमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या आपत्तीच्या प्रसंगी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी दिलेल्या एका विधानावरून वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री सुक्खू यांनी हिमाचल प्रदेशमध्ये होत असलेल्या भूस्खलनासाठी सुक्खू यांनी बिहारी आर्किटेक्ट्सना जबाबदार धरले होते. यावरून आता भाजपाने काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. तसेच सोशल मीडियावरही हा विषय वादाचं केंद्र बनलं आहे.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना केलेलं वक्तव्य व्हायरल होत आहे. त्यांनी सांगितलं की, निर्मिती कामांसाठी अन्य राज्यांमधून लोक येत आहे. ते शास्त्रीय पद्धतींचा अवलंब न करता मजल्यावर मजले चढवत आहेत. बाहेरील आर्किटेक्ट्स येतात. ज्यांना मी बिहारी आर्किटेक्ट्स संबोधतो. ते आले आणि फ्लोअरवर फ्लोअर बांधत गेले. त्यामुळेच हिमाचल प्रदेशमध्ये आपत्ती येत आहेत.
सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या या विधानावर आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बिहार भाजपाचे प्रवक्ते विनोद तावडे यांनी सुक्खू यांच्यावर टीका करताना लिहिले आहे की, देश तोडण्याच्या प्रयत्नात असलेली काँग्रेस आता हिमाचल प्रदेशला प्रादेशिकतेच्या आगीत झोकत आहेत. बिहारींना दोषी ठरवून मुख्यमंत्री सुक्खू यांनी आपला हेतू जाहीर केला आहे. मात्र बिहारमधील आघाडीचे नेते मौन बाळगून आहेत. कदाचित त्यांना काँग्रेसच्या युवराजांचं भय वाटत आहे.
मात्र वाद वाढत असल्याचे पाहून सुखविंदर सिंह सुक्खू यांनी हे विधान फेटाळून लावले. मी असं काही बोललेलो नाही. ते आमच्यासाठी भावासारखे आहेत, अशी सारवासारव केली.