नवी दिल्ली: भारतीय लष्कराला मोदी की सेना म्हणणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. माजी नौदल प्रमुख एल. रामदास यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. यातून त्यांनी सैन्याच्या दुरुपयोगाबद्दल चिंता बोलून दाखवली. निवडणूक प्रचारातील सैन्याचा दुरुपयोग रोखावा, अशी मागणी त्यांनी केली. आपल्या भूमिकेला सैन्य दलातील अनेक अधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याचंदेखील रामदास यांनी पत्रात नमूद केलं आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये सोमवारी एका जनसभेला संबोधित करताना भारतीय सैन्याचा उल्लेख 'मोदी की सेना' असा केला होता. याची दखल घेत निवडणूक आयोगानं अहवाल मागवला आहे. रामदास यांनी त्यांच्या पत्रात जैश-ए-मोहम्मदच्या विरोधात करण्यात आलेल्या एअर स्ट्रइकवरुन सुरू असलेल्या राजकारणाबद्दल चिंता व्यक्त केली. यामुळे मतदारांवर प्रभाव पडू शकतो, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर बालाकोटमध्ये करण्यात आलेले हवाई हल्ले आणि त्यानंतर हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुरक्षित घरवापसीवरुन सुरू असलेल्या राजकारणाकडे रामदास यांनी निवडणूक आयोगाचं लक्ष वेधलं. काही पक्ष निवडणूक रॅली, माध्यमं, सार्वजनिक स्थळांवर नेत्यांच्या सोबतीनं सैन्याचे फोटो वापरुन आपला राजकीय अजेंडा राबवत आहेत, असं रामदास यांनी पत्रात म्हटलं आहे. 'अशा प्रकारची कृती पूर्णपणे चुकीची आहे. यामुळे सुरक्षा दलांच्या मूल्ल्यांवर घाला घातला जात आहे. या सर्व कृती भारतीय संविधानाच्या भावनेच्या विरोधात आहेत,' असंदेखील रामदास यांनी पत्रात म्हटलं आहे. निवडणूक आयोगानं तातडीनं या प्रकरणात लक्ष घालून प्रचारात सैन्याच्या फोटोंचा वापर रोखावा, असं आवाहन त्यांनी केलं. सैन्याच्या राजकीय वापरावरुन काँग्रेस, भाजपानं एकमेकांना लक्ष्य केलं आहे.
योगींच्या 'मोदी की सेना' विधानानं वाद; माजी नौदल प्रमुखांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 6:34 PM