राजस्थानमधील ऐतिहासिक वारसा असलेल्या उदयपूर सिटी पॅलेसमध्ये राज्याभिषेकावरून वाद होऊन महाराणा प्रताप यांच्या वंशजांमध्ये धक्काबुक्की झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. विश्वाराज सिंह यांना मेवाड राज घराण्याचे औपचारिक प्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर काही तासांतच त्यांना महालात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलं. त्यामुळे तणाव निर्माण झाला. तसेच प्रकरण धक्काबुक्की, दगडफेकीपर्यंत पोहोचले. या महिन्याच्या सुरुवातीला वडील महेंद्र सिंह मेवाड यांच्या मृत्यूनंतर चित्तोडगड किल्ल्यात झालेल्या एका समारंभामध्ये विश्वराज यांचा राज्याभिषेक झाला होता. त्यानंतर सोमवारी जेव्हा ते उदयपूर पॅलेसमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना आत प्रवेश करू दिला गेला नाही.
हा संपूर्ण वाद हा विश्वराज सिंह यांचे वडील महेंद्र सिंह मेवाड आणि त्यांचे भाऊ अरविंद सिंह मेवाड यांच्यात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या भांडणामधून उफाळून आला आहे. हे दोघेही राजपूत राजे महाराणा प्रताप यांचं वंशज आहेत. अरविंद सिंह सिटी पॅलेस आणि एकलिंगनाथ मंदिराचं व्यवस्थापन करतात. त्यांच्या निर्णयामुळेच हा वाद अधिक पेटला आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर विश्वराज सिंह यांना राजघराण्याचं प्रमुख बनवण्यात आलं. त्यानंतर त्यांनी परंपरेनुसार कौटुंबिक मंदिर आणि सिटी पॅलेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मात्र काका अरविंद सिंह यांनी पुतणे विश्वराज सिंह यांच्या तिथे येण्यास विरोध केला आणि त्यांना एक नोटिस बजावली. या निर्णयानंतर एक वाद आणखी पेटला.
विश्वराज सिंह आणि अरविंद सिंह मेवाड हे महाराणा प्रताप यांचे वंशज आहेत. तसेच सद्यस्थितीत मंदिर आणि राजवाड्यावर अरविंद यांचा ताबा आहे. या अरविंद सिंह यांनी पुतणे विश्वराज सिंह यांच्या शाही रीतीरिवाजानुसार कौटुंबिक मंदिर आणि राजवाड्यात जाण्याला विरोध केला. तसेच त्यांना नोटिसही बजावली. तसेच ही नोटिस वृत्तपत्रामधूनही प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये अतिक्रमण केल्यास किंवा मालमत्तेचं नुकसान झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला होता. त्यानंतर सिटी पॅलेसच्या गेटबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
चित्तोडगड येथील किल्ल्यात राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर विश्वराज सिंह आणि त्यांचे समर्थक हे राजवाडा आणि मंदिरामध्ये जाण्यासाठी उदयपूर येथे दाखल झाले. मात्र तिथे कडेकोट बंदोबस्त असल्याने त्यांना राजवाड्यात प्रवेश करता आला नाही. विश्वराज सिंह यांच्या समर्थकांनी बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पोलिसांनी अडवले. उदयपूरचे जिल्हाधिकारी अरविंद पोसवाल आणि एसपी योगेश गोयल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा वाद सोडवण्यासाठी विश्वराज सिंह आणि त्यांच्या समर्थकांशी चर्चा केली. मात्र त्यामधून तोडगा निघाला नाही. राजवाड्यात प्रवेश न दिल्याने विश्वराज सिंह आणि त्यांचे समर्थक जगदीश चौक येथे पोहोचले. हा चौक सिटी पॅलेस जवळच आहे. दरम्यान, रात्री उशिरा सिटी पॅलेसमधून येथे दगडफेकही झाल्याचं समोर आलं.