केंद्र सरकारने आणलेल्या हिट अँड रन कायद्यातील जाचक तरतुदींविरोधात देशभरातील ट्रकचालक आणि मालकांनी नववर्षाच्या सुरुवातीलाच संप पुकारला होता. हा संप मिटला असतानात आता फेडरेशन ऑफ कर्नाटक ट्र ओनर्स असोसिएशनने शनिवारी नव्या हिट अँड रन कायद्याविरोधात १७ जानेवारीपासून अनिश्चितकालिन संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. फेडरेशन ऑफ कर्नाटक ट्रक ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सी. नवीन रेड्डी यांनी सांगितले की, असोसिएशनच्या सदस्यांनी नव्या कायद्याबाबत एक बैठक घेतली. तसेच १७ जानेवारीपासून संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.
सी. नवीन रेड्डी यांनी सांगितले की, नव्या कायद्यामुळे सर्वात जास्त अडचण ट्रकचालकांची होणार आहे. आमच्या मागण्यांमध्ये दुर्घटनेच्या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या ट्रकची सुटका करणे आणि अनावश्यक प्रवासी संख्येच्या आधारावर करण्यात येणाऱ्या दंडामध्ये कपात करण्याचा समावेश आहे. १० वर्षांच्या कैदेसह जबर दंडात्मक कारवाईच्या नव्या प्रस्तावामुळे देशभरातील ड्रायव्हर चिंतेत आहेत.
त्यांनी संताप व्यक्त करताना सांगितले की, ट्रकमालक किंवा वाहतूक क्षेत्रातील संबंधितांकडून कुठलाही सल्ला न घेता हा एकतर्फी निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ड्रायव्हर आपलं काम सुरू ठेवण्यास कचरतील. ट्रक उद्योग आणि ड्रायव्हर यांचे हित विचारात घेऊन प्रस्ताविक कायद्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेल्या कठोर नियमांमध्ये शिथिलता आणली पाहिजे.
दरम्यान, या मुद्द्यावरून झालेल्या देशव्यापी आंदोलनानंतर अखिल भारतीय मोटार परिवहन काँग्रेसला सरकारने या कायद्यात तुरुंगवास आणि दंडात्मक कारवाईबाबत केलेल्या तरतुदींना लागू करण्याचा निर्णय हा वाहतूक संघटनेशी सल्लामसलत करून घेतला जाईल, असे सांगितले होते.