रस्त्याने प्रवास करत असताना वाहन चालकांमध्ये वाद तुम्ही अनेकदा पाहिले असतील. बऱ्याचदा हॉर्न वाजवण्यापासून ते किरकोळ अपघातांपर्यंत अनेक कारणांमुळे रस्त्यात तुफान भांडणं होतात. त्याचे व्हिडीओही व्हायरल होतात. मात्र पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकात्यामध्ये शुक्रवारी रात्री चक्क मंत्री आणि आणि खासदारांमध्ये हॉन वाजवण्यावरून कडाक्याचं भांडण झाल्याचं दिसून आलं. ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील मंत्री बाबूल सुप्रियो आणि भाजपा खासदार अभिजित गांगुली यांच्यात हा वाद झाला.
मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे १५ ते २० मिनिटांपर्यंत ही वादाववादी झाली. बाबुल सुप्रियो हे त्यांच्या कारमधून हावडा येथील निवासस्थानी जात होते. तर अभिजित गांगुली हे सुद्धा कोलकात्यामधून हावडा येथे जात होते. त्याचवेळी हॉर्न वाजवण्यावरून दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी वाद घातला. माझ्या कारला अडवण्यात आलं, तसेच माझ्यासोबत गैरवर्तन करण्यात आलं, असा आरोप बाबूल सुप्रियो यांनी केला आहे. तर बाबूल सुप्रियो यांनी माझी कार अडवली आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. बाबूल सुप्रियो हे हॉर्न वाजवण्याला विरोध करत होते, असा आरोप अभिजित गांगुली यांनी केला आहे.
दरम्यान, या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, अभिजित गांगुली यांच्या कारजवळ मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली दिसत आहे. तर पुलावर ही वादावादी सुरू असल्याचंही दिसत आहे. बाबूल सुप्रियो यांनी आरोप केला की, ‘’रात्री दहा वाजता माझ्या कारला शिविगाळ करत लक्ष्य करण्यात आलं. माझ्या गाडीवर आमदार असा उल्लेख कुठेही नाही. मात्र अभिजित गांगुली हे खासदार असा उल्लेख कारवर लिहून फिरत असतात’’, असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, काही वेळाने पोलिसांनी तिथे येत हा वाद मिटवला.
बाबूल सुप्रियो यांनी या वादाबाबत आणखी माहिती देताना सांगितले की,’’मी स्वत: माझी कार चालवत होतो. त्याचवेळी मागून एक कार जोराजोरात हॉर्न वाजवत आली. ती कार ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न करत होती’’. बाबूल सुप्रियो यांनी खाली उतरून पाहिले असता मागून आलेल्या कारवर खासदार, तामलुक असं लिहिलेलं होतं. त्यानंतर ते अभिजित गांगुल यांच्यासोबत बोलण्यासाठी गेले असता दोघांमध्ये वादावादी झाली. दरम्यान, खासदार अभिजित गांगुली यांच्याकडे बाबुल सुप्रियो यांच्यासोबत झालेल्या वादाची व्हिडीओ रेकॉर्डिंग असल्याचंही सांगण्यात येत आहे.