इस्लामाबाद - पाकिस्तानात एका मुस्लिम महिला खासदाराने साडी नेसल्यामुळे नवा वाद पेटला आहे. एमक्यूएमच्या खासदार नसरीन जलील साडी नेसून संसदेत पोहोचल्या होत्या. त्यांनी साडी नेसल्याने जामियात उलेमा-ए-इस्लाम फज्ल (JUI-F) च्या एका खासदाराने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, उलेमा-ए-इस्लाम फज्ल (JUI-F) चे खासदार मुफ्ती अब्दुल सत्तार यांनी साडी नेसण्यावरुन नसरीन जलील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
मुफ्ती अब्दुल सत्तार यांनी नसरीन जलील यांना सल्ला देत, त्यांच्यासारख्या महिलांनी मुस्लिम म्हणून उपस्थिती लावणं गरजेचं आहे असं म्हटलं आहे. नसरीन जलील यांच्या अध्यक्षतेखाली मानवाधिकार आयोगाने मुफ्ती अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपाला उत्तर देताना म्हटलं आहे की, 'इस्लाममध्ये महिलांना चेहरा, हात आणि पाय सोडून सर्व शरीर झाकून ठेवणं अनिवार्य आहे'. यावर बोलताना मुफ्ती अब्दुल सत्तार यांनी म्हटलं की, 'अल्लाहने तुम्हाला इथपर्यंत पोहोचवलं आहे, तुम्ही इतर महिलांसाठी आदर्श उभा केला पाहिजे'.
साडी नेसण्यासाठी मिळालेल्या सल्ल्यावर बोलताना नसरीन जलील यांनी मुफ्ती अब्दुल सत्तार यांना त्यांनी आठवण करुन दिली की, आपण 74 वर्षीय महिला आहोत, जिने मृत्यूवर मात केली आहे. नसरीन जलील यांनी मुफ्ती अब्दुल सत्तार यांनाच उलटा प्रश्न करत महिलांनी कसे कपडे घातले पाहिजेत हे तुम्ही सांगा असं म्हटलं आहे.