मोदी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावार आजपासून चर्चेला सुरुवात झाली आहे. आज दिवसभराच्या कामकाजामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप झाले. मात्र या चर्चेदरम्यान, एक अशी घटना घडली ज्यावरून भाजपा आणि भाजपा नेत्यांना विरोधी पक्षांनी घेरले आहे. त्याचं झालं असं की, सभागृहातील चर्चेवेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे, तसेच भाजपाच्या मंत्र्यांना आक्षेपार्ह भाषणाप्रकरणी निलंबित करण्यात येणार का, असा सवाल आपने विचारला आहे.
अविश्वास प्रस्तावावर चर्चा करताना नारायण राणे यांनी शिवसेना (ठाकरे गट) वर हल्ला केला होता. सभागृहातील समोर आलेल्या एका व्हिडीओनुसार चर्चेदरम्यान नारायण राणे यांनी ठाकरे गटासाठी ‘औकात’ या शब्दाचा उच्चार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रश्न उपस्थित करण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नाही, असे नारायण राणे म्हणाले होते. या दरम्यान, अध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेल्या राजेंद्र अग्रवाल यांनीही नारायण राणे यांना रोखत वैयक्तिक टिप्पणी न करण्याचा सल्ला दिला. त्यांनी राणेंना दोन वेळा ताकीद दिली. तसेच खाली बसण्यास सांगितले.
या अविश्वास प्रस्तावारवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत बोलले होते. त्यानंतर नारायण राणे बोलण्यासाठी उभे राहिले. त्यांनी आक्रमकपणे बोलण्यास सुरुवात केली. तसेच अरविंद सावंत यांचं भाषण ऐकूण आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत आहे की काय असं वाटलं, असा टोला लगावला.
ते पुढे म्हणाले की, ज्या हिंदुत्वाबाबत हे बोलतात की त्यांना गर्व आहे, ते हिंदुत्व २०१९ मध्ये सत्तेसाठी भाजपाला फसवून शरद पवारांसोबत गेले तेव्हा कुठे होते. मी १९६७चा शिवसैनिक आहे, असंही राणेंनी सांगितलं, तेव्हा ठाकरे गटाचे खासदास गोंधळ घालू लागते. तेव्हा नारायण राणे यांनी त्यांच्यावर जोरदार प्रतिहल्ला केला. ते म्हणाले बसा बसा, मागे बसा, त्यावेळी अध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेल्या अग्रवाल यांनी नारायण राणे यांना रोखले.
मात्र नारायण राणे अधिकच आक्रमकपणे बोलू लागले. ते म्हणाले की, आमच्या मुख्यमंत्र्यांवर कुणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. यांची औकात नाही आहे मोदींवर बोलायची. जर कुणी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याकडे बोट दाखवलं, तर मी तुमची औकात काढेन, असा इशारा नारायण राणे यांनी दिला. यावरूनच आता आपने राणेंवर टीका केली आहे.