हरीश गुप्ता नवी दिल्ली: राजपथावरील गणराज्यदिन पथसंचलनाच्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना सहाव्या रांगेत बसविण्यात आल्यामुळे वाद उफाळला आहे. मोदी सरकारचे क्षुद्र राजकारण जगजाहीर झाल्याचा आरोप करीत काँग्रेसने या मुद्यावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.दरम्यान, राहुल गांधी यांनी जागा किंवा रांगेबाबत मी चिंता करीत नाही, राष्ट्रपती भवनात शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या ‘अॅट होम’ कार्यक्रमातही मी जागेबाबत तमा बाळगली नव्हती, असे सांगत भाष्य टाळले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी १० आसियान देशांच्या प्रमुखांसाठी आयोजित केलेल्या अॅट होम कार्यक्रमात राहुल गांधी यांना व्हीआयपींमध्ये दुस-या रांगेत स्थान देण्यात आले होते. केंद्रीय मंत्री, खासदार, राजदूत आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
गणराज्यदिनानिमित्त राष्ट्रपतींनी आयोजित केलेले चहापान यावेळी वैशिष्ट्यपूर्ण ठरले. पहिल्यांदाच आसियानचे दहा राष्ट्रप्रमुख उपस्थित होते. गणराज्यदिनाच्या कार्यक्रमात राहुल गांधी सहाव्या रांगेत बसले होते. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्याशी चर्चा करताना दिसून आले. सर्व पाहुण्यांना कार्यक्रमाच्या मुख्य स्थळी मोबाईल फोन सोबत आणण्याची मुभा देण्यात आली होती. अनेकांनी आपापल्या आवडीच्या व्हीआयपींचे मुक्तपणे फोटो आणि व्हिडिओ घेतले.
विशेष म्हणजे दरवर्षी यादीत वाढ होत असताना पाहुण्यांची संख्या यावेळी ३ हजारावरून १२०० वर आणण्यात आली होती. पाहुण्यांच्या गर्दीवर आवर घालणे अवघड होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पाहुण्यांना भेटणे सहज शक्य व्हावे, या उद्देशाने यावेळी यादीत कपात करण्यात आली. विविध देशांचे राजदूत, पुरस्कारविजेते आणि खासदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. मंत्री आणि व्हीआयपींना मुख्य स्थळी प्रवेश देण्यात आला होता. पंतप्रधानांनी नेहमीच्या शैलीत पाहुण्यांना सेल्फी घेण्याला परवानगी दिली.स्वराज यांची अनुपस्थिती खटकली...राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या चहापानाला विदेश मंत्री सुषमा स्वराज यांची अनुपस्थिती चर्चेची ठरली. विविध देशांच्या राजदूतांना त्यांना भेटता आले नाही. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन,विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन व मंत्री पत्रकारांमध्ये मिसळले तर नेहमी पत्रकारांच्या गराड्यात राहणारे अर्थमंत्री अरुण जेटली आणि प्रकाश जावडेकर आपल्या जागेवरच बसून राहिले.
अहंकारी सरकारने परंपरा बाजूला सारली-काँग्रेसराहुल गांधी यांना पथसंचलन कार्यक्रमात पहिल्या रांगेत स्थान न मिळाल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गणराज्यदिनाच्या राष्टÑीय पर्वावर अहंकारी सरकारने सर्व परंपरा बाजूला सारल्या, त्यांना आधी चौथ्या तर नंतर सहाव्या रांगेत हेतुपुरस्सर बसविण्यात आले, असे मुख्य प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी म्हटले. मोदी सरकारचे क्षुद्र राजकारण जगजाहीर झाले आहे, असे टिष्ट्वट त्यांनी केले. टिष्ट्वटमध्ये राहुल गांधी मागे बसले असल्याचा फोटोही आहे. या समारंभाच्या पहिल्या रांगेत माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा आणि मनमोहनसिंग बसले होते. दुसºया रांगेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि थावरचंद गहलोत यांना स्थान देण्यात आले. गतवर्षी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले होते.
मोदींनी केले हस्तांदोलनराहुल गांधी सहाव्या रांगेत बसले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बरीच मजल गाठावी लागली. राहुल गांधी यांच्याशी हस्तांदोलन करीत त्यांनी गणराज्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. ४७ वर्षीय राहुल यांचा हात हातात घेत त्यांनी कसे आहात? असा प्रश्न केला. गांधी यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.