नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू यूनिव्हर्सिटीची (जेएनयू) माजी विद्यार्थी नेता शेहला रशीद पुन्हा एकदा वादात अडकली आहे. यावेळी खुद्द तिचे वडील अब्दुल रशीद शोरा यांनीच तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शेहला देश विरोधी कारवायांमध्ये सामील असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात शेहला रशीदच्या वडिलांनी जम्मू काश्मीरच्या पोलीस महासंचालकांना (डीजीपी) पत्रही लिहिले आहे. यात म्हणण्यात आले आहे, की त्यांची मुलगी देशविरोधी कारवायांमध्ये सामील आहे. एवढेच नाही तर मुली आणि पत्नीकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
शेहला रशीदच्या वडिलांनी आरोप करत दावा केला आहे, की शेहलाला परदेशातून तीन कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. व्यापारी जहूर अमहद शाह वटालीने शेहलाला जेकेपीएम पार्टीत सामील होण्यासाठी 3 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, शेहला वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर यापूर्वीही ती अनेक वेळा वादात सापडली आहे.
वाद आणि शेहलाचे जुनेच नाते - कलम 370 - जम्मू काश्मीरचे कलम 370 हटवल्यावरूनही शेहला रशीद वादात सापडली आहे. शेहला रशीद मुळची जम्मू काश्मीरमधील आहे. तसेच जम्मू काश्मीरला लागू असलेले कलम 370 हटवल्यावरूनही अनेक वेळा तिने आपली प्रतिक्रिया दिला आहे. तिने कलम 370 हटवण्याला विरोध केला होता.
राजद्रोहाचा खटला - शेहला रशीदने ऑगस्ट 2019मध्ये भारतीय जवानांवर अनेक आरोप केले होते. शेहलाने आरोप केला होता, की भारतीय जवान काश्मिरी नागरिकांवर अत्याचार करतात. यावरूनही शेहला वादात अडकली होती. मात्र, लष्कराने तिचे आरोप फेटाळून लावले होते. याशिवाय, दिल्ली पोलिसांनी शेहलाविरोधात राजद्रोहाचा खटलाही नोंदवला होता.
अटकेला विरोध - शेहला जवाहरलाल नेहरू विद्यार्थी संघटनेची उपाध्यक्षही होती. फेब्रुवारी 2016मध्ये जेएनयूचा तत्कालीन विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार आणि उमर खालिदविरोधात राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला होता. तेव्हा अनेकांना अटकही करण्यात आली होती. याविरोधात निदर्शन करूनही शेहलाने वाद उत्पन्न केला होता.
राजकारणात प्रवेश - शेहलाने राजकारणातही प्रवेश केला आहे. राजकारणात प्रवेश करताना शेहला सर्वप्रथम नॅशनल कॉन्फ्रन्ससोबत आली. यानंतर ती आयएएसची नोकरी सोडून राजकारणात आलेल्या शाह फैसल यांच्या पक्ष केपीएमध्ये सामील झाली. मात्र, आता शेहला राजकारणापासून दूर आहे आणि तिने निवडणुकीच्या राजकारणापासून संन्यास घेण्याची घोषणाही केली आहे.
भारत विरोधी वक्तव्ये -शेहला रशीद अनेक वेळा भारत विरोधी वक्तव्ये करतानाही दिसून आली आहे. अपल्या भारतविरोधी वक्तव्यांमुळेही शेहला अनेक वेळा वादात सापली आहे.