शीलेश शर्मा नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत फारच मोठा पराभव झाल्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह उफाळून आला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरुद्ध प्रदेश अध्यक्ष सचिन पायलट त्यांना पदावरून दूर करण्याच्या मोहिमेत आहेत. गेहलोत यांना आता कोणत्याही समुदायाचा पाया नसल्यामुळे त्यांच्या जागी पायलट यांची नियुक्ती करावी, अशी पायलट समर्थकांची मागणी आहे.पंजाबमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांनी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्याविरुद्ध आघाडी उभारून बंडच केले आहे. तेलंगणामध्ये काँग्रेसचे १५ आमदार तेलंगण राष्ट्र समितीत प्रवेश करण्याच्या प्रयत्नांत आहेत, तर अंतर्गत कलहामुळे कर्नाटकातील कुमारस्वामी यांचे आघाडीचे सरकार संकटात आले आहे. विशेष म्हणजे ही बंडखोरी व कलह शांत करण्यासाठी अद्याप पक्षश्रेष्ठींपैकी कोणी पुढाकार घेतलेला नाही. त्याचे कारण म्हणजे पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनाम्याची तयारी दाखविल्यानंतर ते पक्षाच्या अंतर्गत प्रश्नांत सक्रिय नाहीत.
प्रियांका गांधी आघाडी सांभाळणार?पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी आघाडी सांभाळण्याच्या तयारीत आहेत. त्या लवकरच कार्यकर्ते व नेत्यांशी चर्चा करतील. त्यांची नजर आता २०२२ मध्ये उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर आहे. त्यासाठी त्या गट पातळीवर पक्ष बळकट करू पाहत आहेत, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.