काँग्रेस, भाजपामध्ये फुटले बंडोबांचे पेव!, शांत करण्याचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 05:08 AM2019-03-24T05:08:02+5:302019-03-24T05:08:51+5:30
काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा व शिवसेनेचे काही उमेदवार अद्याप जाहीर झाले नसतानाच भाजपा व काँग्रेसमध्ये बंडोबांचे पेव फुटले आहे. त्यांना शांत करणे आणि उमेदवारी मागे घ्यायला लावणे, हे आता या पक्षांपुढे मोठेच आव्हान असणार आहे.
मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा व शिवसेनेचे काही उमेदवार अद्याप जाहीर झाले नसतानाच भाजपा व काँग्रेसमध्ये बंडोबांचे पेव फुटले आहे. त्यांना शांत करणे आणि उमेदवारी मागे घ्यायला लावणे, हे आता या पक्षांपुढे मोठेच आव्हान असणार आहे. त्यातच काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील गैरहजर राहिल्याने ते नक्की कोणाबरोबर हा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय काही उमेदवारांच्या निवडीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हेच नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे.
नाशिकमध्ये भाजपाचे माजी आमदार अॅड. माणिकराव कोकाटे यांनी बंडखोरीची तयारी केली आहे. युती होणार नाही, हे गृहीत धरून अॅड. कोकाटे यांनी निवडणुकीची तयारी केली होती. पण युती झाली, नाशिकची जागा शिवसेनेकडे गेल्याने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी मिळाली. त्यामुळे कोकाटे यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. दिंडोरीमध्ये राष्ट्रवादीतून भाजपामध्ये आलेल्या डॉ. भारती पवार यांना लगेचच उमेदवारी मिळताच विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण संतापले आहेत. ते रविवारी समर्थकांच्या बैठकीत पुढे काय करायचे, याचा निर्णय घेणार आहेत. चव्हाण यांनी गेल्या निवडणुकीत भारती पवार यांचा सुमारे अडीच लाख मतांनी पराभव केला होता.
माढा मतदारसंघात शनिवारी राजकीय हादरा बसला. दोन महिन्यांपूर्वीच काँग्रेसच्या सातारा जिल्हाध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतलेल्या रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांनी भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. ते सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांना भाजपा उमेदवारी देण्याची शक्यता आहे. याआधी राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंहमोहिते-पाटील यांचे पुत्र रणजीतसिंह यांनी भाजपात प्रवेश केला, तेव्हा त्यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. पण आतापर्यंत भाजपाबरोबर असलेल्या संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीची वाट धरून उमेदवारी मिळवली. दुसरीकडे रणजीतसिंह यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने निंबाळकर यांनी उमेदवारीसाठी भाजपाची वाट धरली. ते शिवसेनेचे माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचे पुत्र आहेत.
काँग्रेसने चंद्रपूर मतदारसंघात माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे यांना उमेदवारी करताच, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांतील कार्यकर्ते संतापले. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगावात तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवारी वामनराव कासावार यांना प्रचंड रोष व्यक्त करीत पदाचे राजीनामे सोपविले. येथील काँग्रेस कार्यालयातील पक्षाचे बॅनर काढून कार्यालय बंद करीत असल्याची घोषणा केली.
काँग्रेसचे औरंगाबादमधील उमेदवार म्हणून आ. सुभाष झांबड यांचे नाव घोषित होताच जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा व सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आणि आपण औरंगाबादमधून अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले.
नगर, शिर्डीतही खदखद
शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार जाहीर झालेला असताना सध्या भाजपात असलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला आहे. अहमदनगर मतदारसंघात भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे व विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्या समर्थकांचे रविवारी परस्परविरोधी मेळावे होत आहेत.
उमरग्यात आत्मदहनाचा प्रयत्न
उस्मानाबादचे खा. रवी गायकवाड यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांच्या समर्थकांत संतप्त भावना निर्माण झाली आहे़ शनिवारी भूमिका ठरविण्यासाठी आयोजित उमरगा येथील मेळाव्यात एका समर्थकाने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला़ सेनेने माजी आ़ ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे़ त्यामुळे नाराज खा. गायकवाड समर्थकांनी बैठक घेऊन पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी आपापल्या पदाचे राजीनामे देण्याचे एकमुखाने ठरविले. याशिवाय गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात कायम राहतील आणि त्यांचा उमेदवारी अर्ज वाजतगाजत भरण्याचे निश्चित केले.
युतीच्या घटक पक्षातही चुळबूळ
लोकसभेची एकही जागा न मिळालेल्या युतीच्या घटक पक्षांमध्येही चुळबूळ आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षावर शनिवारी बैठक घेऊन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, रासपाचे महादेव जानकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी सविस्तर चर्चा करुन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
(नाशिक, सातारा, सोलापूर व चंद्रपूर (यवतमाळ) येथील प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीच्या आधारे)
राष्ट्रवादीनं कुठलं पुण्य केलेलं नाही
‘राष्ट्रवादीनं कुठलं पुण्य केलेलं नाही की, मी त्यांच्या पारड्यात माप टाकावं ! मी साताऱ्यात उदयनराजेंबरोबर आहे; पण माढ्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. मात्र, माढ्यावर माझं बारकाईनं लक्ष असून, तिथला चांगला निकाल तुम्हाला ऐकायला मिळेल,’ असे सूचक विधान माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी केले आहे.