परप्रांतियांनी बळकावल्या जागा मनपाचे सोयीस्कर दुर्लक्ष : प्रत्येक व्यावसायिकाने अडवलीय दहा-दहा हॉकर्सची जागा
By admin | Published: April 10, 2016 10:38 PM
या अतिक्रमणांना अभय कुणाचे?
या अतिक्रमणांना अभय कुणाचे?जळगाव : एकीकडे मनपा शहरातील प्रमुख रस्त्यांवर २०-२५ वर्षांपासून व्यवसाय करीत असलेल्या हॉकर्सवर कारवाई करून हटवित असताना समांतर रस्त्यावर तसेच रिंगरोड परिसरात मोठ्या प्रमाणावर परप्रांतातून आलेल्या व्यावसायिकांनी जागा बळकावल्या आहेत. त्यांच्यावर कारवाईची हिंमत मात्र अतिक्रमण विभागाची होत नाही. या अतिक्रमणांना कुणाचे अभय आहे? अशी चर्चा आता मनपा वर्तुळात सुरू झाली आहे. ३०० रुपयात १० हॉकर्सची जागामहामार्गालगतच्या समांतर रस्त्यावर गेल्या काही वर्षांपासून बॅट विक्रेते, स्वेटर व इतर वस्तू विक्रेते, नर्सरी यांचे अतिक्रमण झाले आहे. या प्रत्येक व्यावसायिकाने किमान १० हॉकर्सची जागा बळकावलेली असताना केवळ ३०० रुपयांची पावती फाडली जात आहे. तर परप्रांतातून आलेल्या नर्सरी चालकाने समांतर रस्तादेखील अतिक्रमणात गिळंकृत करून टाकला आहे. मात्र त्यावर कारवाईची हिंमत मनपा अतिक्रमण विभागाची झालेली नाही. पाच महिन्यांपूर्वी अतिक्रमणे काढलेल्या सागर पार्कवरील हॉकर्सना आयटीआय नजीक जागा देण्यात आली मात्र तेथे असलेल्या नर्सरीमुळे जागा अपूर्ण पडते. तसेच बॅट विक्रेत्यांनीही मोठी जागा व्यापली आहे. ही मंडळी हॉकर्सना धमकावत असते. आयुक्त सर्व ठिकाणी भेट देतात मग या हॉकर्सबाबत उदासिनता का? असा सवाल हॉकर्सने केला आहे. त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिक्रमणाला अभय कुणाचे? असा सवाल उपस्थित झाला आहे. आयटीआयजवळ हॉकर्सला जागा दिली. तेथे व्यवसायही सुरू केला. मात्र शहरातील एका लोकप्रतिनिधीचा मुलगा व एक हॉटेल व्यावसायिकाचा मुलगाच हॉकर्सला दमदाटी करीत असल्याचे समजते. असेच प्रकार अन्य ठिकाणीही असून त्यामुळे अतिक्रमण विभागही सोयीस्करपणे कानाडोळा करीत कारवाईस टाळाटाळ करीत असल्याचे समजते.रिंगरोडला पुन्हा अतिक्रमणाचा विळखारिंगरोडवर बहिणाबाई उद्यान ते तापी महामंडळ कार्यालयापर्यंत पुन्हा अतिक्रमण फोफावले आहे. या रस्त्यावरील अतिक्रमण मनपाने काढले होते. तसेच गिरणा पाटबंधारे विभागाचे कर्मचारी निवासस्थानांचे अतिक्रमण तोडीत रस्त्याचे रुंदीकरणही केले होते. त्यानंतर या रस्त्याचे डांबरीकरणही करण्यात आले. मात्र रस्त्याच्या काठाने असलेले मोठे वृक्ष कायम असल्याने त्याचा आधार घेत या रस्त्यावर पुन्हा मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण फोफावले आहे. माठ व अन्य वस्तू विक्रेते, गॅरेज, मेसचे अतिक्रमण झाले आहे. या अतिक्रमणांना एका नगरसेवकाचेच अभय असल्याने अतिक्रमण विभाग याकडे सोयीस्करपणे दूर्लक्ष करीत असल्याची चर्चा आहे. अशा रितीने ठराविक अतिक्रमणांना पाठीशी घातले जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.