अधिवेशन-बीड बाजारसमिती घोटाळा
By admin | Published: March 25, 2015 9:10 PM
बीड बाजार समितीमधील घोटाळ्यात गुन्हे दाखल करणार
बीड बाजार समितीमधील घोटाळ्यात गुन्हे दाखल करणार-पणन राज्यमंत्री राम शिंदे यांची घोषणामुंबई- बीड येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये २०११-१२ या वर्षात झालेल्या उडीद खरेदी घोटाळ्यातील दोषींवर आजच्या आज गुन्हे नोंदवण्याचे आदेश देण्यात येतील, अशी घोषणा पणन राज्यमंत्री राम शिंदे यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. तसेच या समितीमध्ये गाळे वाटप व अन्य व्यवहारांमधील अनियमिततेची सहकार विभागाच्या सहसंचालकांमार्फत दोन महिन्यांत चौकशी करण्यात येईल, असेही शिंदे यांनी जाहीर केले.विनायक मेटे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना दाखल केली होती. त्यावरील चर्चेला उत्तर देताना शिंदे म्हणाले की, बीड कृषि उत्पन्न बाजार समितीने २०११-१२ या वर्षात उडीद डाळीची खरेदी केली. या परिसरात उडीद डाळीचा पेरा नसताना व ४३०० रुपये किमान आधारभूत किंमत असताना २८०० रुपये दराने खरेदी केली. या खरेदी व्यवहाराची तत्कालीन जिल्हाधिकार्यांनी चौकशी करून अहवाल दिल्यानंतर २०१३ मध्ये गुन्हे दाखल करण्याची शिफारस केली होती. तत्कालीन सरकारने या घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई न करता कोकण विभागीय आयुक्तांकडे फेरविचाराकरिता हे प्रकरण सोपवले. २०१३ मधील चौकशी अहवालानुसार आजच्या आज गुन्हेगारांवर कारवाई केली जाईल.याखेरीज या बाजार समितीने आपली १४ एकर जुनी जागा विकून ४९ एकर १८ गुंठे जमीन खरेदी केली. या जमिनीवरील १४६ गाळ्यांच्या वितरणात घोटाळा झाल्याची तक्रार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, गाळ्यांच्या माध्यमातून बाजार समितीला १ कोटी ८५ लाख रुपये उत्पन्न येणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ८७ लाख २० हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. या व अशा अनियमिततांची चौकशी सहकार विभागाच्या सहसंचालकांकडून दोन महिन्यांत करून घेण्यात येईल, असे शिंदे यांनी जाहीर केले. (विशेष प्रतिनिधी)