नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन उद्या, सोमवारपासून सुरू होत असून, त्या पार्श्वभूमीवर केलेल्या चाचणीत पाच खासदारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. कोरोनामुळे सभागृहांचे कामकाज रोज चारच तास चालणार आहे.काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उपचारांसाठी शनिवारी अमेरिकेला रवाना झाल्या आहेत. त्यांच्यासोबत राहुल गांधी हेही गेले असल्याने दोन्ही नेते काही दिवस लोकसभेत नसतील. त्यामुळे लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांची जबाबदारी वाढली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्याही कोरोना चाचण्या करण्यात येत असून त्यातील काही मंत्र्यांच्या चाचण्या अद्याप बाकी आहेत. अधिवेशन सुरू होण्याच्या ३ दिवस आधी खासदारांना कोरोना चाचणी करून घ्यावी, असे त्यांना सांगण्यात आले आहे.अधिवेशनाआधीची सर्वपक्षीय बैठक कोरोना साथीमुळे यंदा रद्द करण्यात आली. बैठकीची संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी तयारी केली होती. कोरोना साथीमुळे प्रश्नोत्तराच्या तासाचा कालावधी अर्ध्या तासावर आणण्यात आला आहे. प्रश्नांची उत्तरेही लेखी स्वरूपात दिली जातील. फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचे असल्याने राज्यसभा चेंबर, गॅलरी, लोकसभा चेंबर येथे खासदारांच्या बसण्याची सोय करण्यात आली आहे. सभागृहाचे कामकाज व सदस्याचे भाषण नीट ऐकता यावे यासाठी दोन्ही सभागृहांच्या गॅलरीमध्ये स्क्रीन लावण्यात आले आहेत.
अधिवेशन आजपासून, पाच खासदारांना कोरोनाची बाधा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 1:11 AM