कोरोनाचं थैमान अजूनही सुरूच आहे. आता तर लॉकडाऊनमधील काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोक बाहेर पडत आहेत आणि त्यामुळे कोरोनाचे रूग्णही दिवसेंदिवस वाढत आहेत. दरम्यान पुन्हा एकदा लग्नांना सुरूवात झाली आहे.
अनेक शहरांमधून लग्नाच्या बातम्या येत आहेत. दरम्यान एका लग्नाची एक चिंताजनक बाब समोर आली आहे. एका लग्नातील जेवण तयार करणाऱ्या आचाऱ्यालाच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने अनेकांची चिंता वाढली आहे.
AajTak ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना आहे मध्य प्रदेशातील छतरपूरची. येथील ग्राम पंचायत बंधामध्ये झालेल्या एका लग्नात जी व्यक्ती जेवण तयार करण्यासाठी आली होती ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह होती. आधी याबाबत कुणालाच माहिती नव्हती. ही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितल्यावर लग्न घरात एकच गोंधळ उडाला.
तत्काळ घटनास्थळी पोहोचून पंचायत समितीच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी आचाऱ्याला जिल्हा हॉस्पिटलमध्ये पाठवलं आणि त्याच्या संपर्कात येणाऱ्या वधू-वरासहीत 86 लोकांची थर्मल स्क्रीनिंग सुरू केली.
स्क्रीनिंगनंतर सर्वांनाच होम क्वारंटाइन केलं असून त्यांना सरकारी शाळेत ठेवण्यात आलं आहे. सोबत याच आरोग्य विभागाच्या टीमने सगळी व्यवस्था बघत लग्न समारंभही संपन्न केला.
इतकेच नाही तर प्रशासनाने वर-वधूसहीत इतर लोकांना 14 दिवसांसाठी क्वारंटाइन केलंय. तसेच ज्या परिसरात लग्न होतं त्या परिसराला कन्टेमेंट झोन घोषित केलंय.