केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांनी महत्वाची माहिती दिली आहे. आता सहकारी बँकेच्या ग्राहकांनाही सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. यासाठी सरकार सहकारी बँकांना डायरेक्ट बँक ट्रान्सफरसोबत (DBT) जोडणार आहे. अमित शहा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एका कार्यक्रमाला संबोधित करताना ही माहिती दिली.
सध्या सरकारमधील 52 मंत्रालयांकडून चालविल्याजाणाऱ्या 300 योजनांचा लाभ डीबीटीच्या माध्यामाने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविला जात आहे. अर्थात या सर्व योजनांचा लाभ आता सहकारी बँकांच्या ग्राहकांनाही मिळेल.
अमित शाहंनी दिली महत्वाची माहिती -सहकारमंत्री अमित शाह म्हणाले, बँकिंग क्षेत्रात पूर्वीच्या तुलनेत मोठी सुधारणा झाली आहे. यामुळे देशातील नागरिकांना बँकिंग सेवेचा लाभ मिळत आहे. जन धन योजनेमुळे 45 कोटी नवीन लोकांचे बँक खातेही उघडण्यात आले आहेत. एवढेच नाही, तर अशा 32 कोटी ग्राहकांना रुपे डेबिट कार्ड देखील मिळाले आहे. हे सर्व पीएम मोदींच्या 'सहकार से समृद्धी का संकल्प'मुळेच शक्य झाले आहे.
बँक ग्राहकांची होणार चांदी - अमित शाह म्हणाले, 'देशाच्या समृद्धीसाठी आणि आर्थिक उन्नतीसाठी सहकार क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान असेल. पीएम जनधन योजनेंतर्गत उघडण्यात आलेल्या कोट्यवधी नव्या खात्यांचे डिजिटल व्यवहार एक ट्रिलियन डॉलरपेक्षाही पुढे गेले आहेत. 2017-18 च्या डिजिटल व्यवहारांच्या तुलनेत यात 50 पट वाढ झाली आहे. सहकारी बँका डीबीटीसोबत जोडल्या गेल्यानंतर, नांगरिकांसोबत आणखी संपर्क वाढेल आणि सहकार क्षेत्र बळकट होईल.'