पाटणा- उत्तर प्रदेशच्या माहोबामधील पाच पोलिसांनी बलात्कारातील आरोपीला तात्काळ अटक केल्यामुळे त्यांना मिळालेलं रोख रक्कमेचं बक्षीस बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना दिलं आहे. सहा वर्षीय चिमुरडीवर ती शौचास जात असताना बलात्कार झाला होता त्याच चिमुरडीच्या कुटुंबीयांना शौचालया बांधण्यासाठी पोलिसांनी त्यांना मिळालेलं रोख रक्कमेचं बक्षीस दिलं. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात एक सहा वर्षांची चिमुरडी मध्यरात्री तीन वाजता घरापासून 50 मीटर अंतरावर उघड्यावर शौचास गेली असताना तिच्यावर बलात्कार झाला होता.
याप्रकरणाचा तपास करत असणाऱ्या पोलिसांच्या पथकाने दोन दिवसाच्या आत आरोपीचा छडा लावून त्याला अटक केली. पोलिसांच्या टीममध्ये पोलीस निरीक्षक विक्रम आदित्य सिंह, वरीष्ठ पोलीस उपनिरीक्षक केपी सिंह, जिल्हा गुन्हे रेकॉर्ड ब्युरोचे प्रभारी एम.के झैडी आणि इतर दोन पोलिसांचा समावेश होता. या टीमने दोन दिवसात आरोपीला अटक केली.
पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचं कौतुक करण्यासाठी उत्तर प्रदेशातील एका एनजीओने व तेथिल स्थानिक आमदार राजेश गोस्वामी यांनी मिळून पोलिसांना 5 हजार व 5 हजार 100 रूपयांचं रोख बक्षीस दिलं. 2 फेब्रुवारी रोजी पोलिसांना रोख रक्कमेचं हे बक्षीस मिळालं. त्याच दिवशी त्यांनी ते बक्षीस पीडित मुलीच्या वडिलांना घरात शौचालय बांधण्यासाठी सूपूर्द केलं. तसंच शौचालय बांधण्यासाठी लागणारे जास्तीचे पैसे पगारातून दिले जाणार असल्याचंही सांगितलं.
पीडित मुलीच्या वडिलांना दिलेले पैसे शौचालय बांधण्यासाठी अपूरे आहेत. याची कल्पना आहे. आमच्या पगारातून आम्ही आणखी मदत देण्याचं प्रयत्न करू. पीडित मुलीच्या घरात शौचालय बांधणं हेच आमचं ध्येय आहे, असं पोलीस निरीक्षक विक्रम आदित्य सिंह यांनी म्हंटलं.
पोलिसांच्या माहितीनुसार, सहा वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करणारा आरोपी हा तिच्याच परिसरात राहणार होता. पीडित चिमुरडी रात्रीच्या वेळी शौचालयाला गेल्यामुळे ही घटना घडली होती. म्हणूनच तिच्या घरी शौचालय बांधायला पैसे जमा करायचं ठरवलं, असं पोलिसांनी सांगितलं.