नवी दिल्ली : भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्याच्या त्यांच्या आदेशाची प्रत त्यांना दोन दिवसात देण्यात येईल, असे केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले.
यूपीएससीचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्यात आल्याच्या आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकाला आव्हान देणारी याचिका निकाली काढली. न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप केलेला नाही किंवा खटल्याच्या गुणवत्तेवर कोणतेही मत व्यक्त केले नाही, असे सिंह यांनी स्पष्ट केले.
कॅटकडे जाणार?आदेशाला आव्हान देण्यासारख्या इतर सवलतींसाठी खेडकरांना प्रशासकीय न्यायाधीकरणाकडे (कॅट) जावे लागेल, असे आदेशात म्हटले.
सुनावणीदरम्यान, खेडकर यांच्या बाजूने उपस्थित असलेल्या ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी सांगितले की, त्यांच्या अशिलाला उमेदवारी रद्द करण्याच्या निर्णयाबद्दल कधीही माहिती देण्यात आली नाही. केवळ एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे याची माहिती मिळाली.