जयपूर/बिकानेर : अत्यंत चोख सुरक्षा व्यवस्थेत रविवारी राजस्थानमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा (रीट-२०२१) पार पडली. चप्पलेत ब्ल्यूटुथ उपकरण जोडून परीक्षेत नक्कल (कॉपी) करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन परीक्षार्थींसह पाचजणांना बिकानेरमधून अटक करण्यात आली आहे.
राजस्थान माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने आयोजित रीट परीक्षेसाठी राज्यभरातील सर्व ३३ जिल्ह्यांमध्ये ३,९९३ परीक्षा केंद्र स्थापन करण्यात आली होती. दोन सत्रात घेण्यात आलेल्या या परीक्षेला १६ लाख ५१ हजार उमेदवार बसले होते.परीक्षेत उमेदवारांना कोणत्याही प्रकारे नक्कल करता येऊ नये म्हणून खबरदारीचे उपाय करण्यात आले होते. रविवारी जयपूरसह अनेक जिल्ह्यांतील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.
या परीक्षेत कॉपी करण्यासाठी ब्ल्यूटुथ उपकरण जोडलेल्या चप्पला घातल्याचे आढळल्यानंतर पाचजणांना बिकानेरमध्ये अटक करण्यात आली. रीट परीक्षेशी संबंधित घोटाळ्याप्रकरणी विविध ठिकाणांहून अन्य सातजणांना अटक करण्यात आली आहे.
बिकानेरचे पोलीस अधीक्षक प्रीती चंद्रा यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्यांपैकी दोघांची नावे मदन लाल आणि त्रिलोकचंद असून, ब्ल्यूटुथ उपकरण जोडलेल्या चप्पला परीक्षार्थी किंवा त्यांच्या नातेवाईकांना उपलब्ध करुन देणाऱ्या टोळीचे ते सदस्य आहेत. अन्य तीन परीक्षार्थी आहेत.
परीक्षेच्या आधी या पाचजणांना गंगा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानकावर पकडण्यात आले. त्यांच्याकडून ब्ल्यूटुथ उपकरण जोडलेल्या चप्पला आणि अन्य उपकरणे जप्त करण्यात आली. सहा लाख रुपयांत ब्ल्युटूथ उपकरण जोडलेल्या चप्पला परीक्षार्थींना विकण्यात आल्या होत्या. या टोळीचा म्होरका असलेला मुख्य आरोपी फरार असून, या टोळीतील दोघांना अटक करण्यात आली आहे.