ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - कोणत्याही साहित्य कलाकृतीच्या शीर्षकावर कॉपीराईट लागू होऊ शकत नाही असे मत मांडत सुप्रीम कोर्टाने देसी बॉईज चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधातील फौजदारी खटला रद्द करण्याचे आदेश दिले आहे.
देसी बॉईजचे कथानक आणि शीर्षक चोरल्याचा दावा करत लेखक शाम देवकत्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. २००८ मध्ये या कथानकाची चित्रपट लेखक संघटनेकडे नोंदणी केल्याचा दावाही देवकत्ते यांनी केला होता. याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने चित्रपटाचे निर्माते कृषिका लल्ला, दिग्दर्शक रोहित धवन आदींविरोधात फौजदारी दाखल करण्याचे आदेश दिले होते. हायकोर्टाच्या निकालाविरोधात लल्ला, धवन यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर बुधवारी सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. विद्यमान प्रकरणात देसी बॉइज या शीर्षकावर कोणताही कॉपीराईट नाही असे कोर्टाने स्पष्ट केले. नोंदणीकृत ट्रेडमार्कच्या बाबतीमध्ये हा निर्णय लागू होऊ शकत नाही असे कोर्टाने सांगितले.