नवी दिल्ली - कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाला नियंत्रित ठेवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. भारतात कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या विविध व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी बूस्टर डोसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारतात १८ वर्षावरील लोकांना ई कॉर्बेवैक्स बूस्टर शॉट उपलब्ध करून देण्याला सरकारने मान्यता दिली आहे.
भारत सरकारने ई कॉर्बेवैक्स बूस्टर शॉटला मान्यता दिली आहे. त्यामुळे ज्या लोकांनी कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनचे डोस घेतले आहेत ते कॉर्बेवैक्स बूस्टर डोस घेऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील २४ तासांत १६ हजारांहून जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्या १ लाख २८ हजार २६१ इतकी आहे. तर गेल्या २४ तासांत १९ हजार ५३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
९ ऑगस्टला देशात १२,७५१ कोरोना संक्रमित सापडले. तर ८ ऑगस्टला १६ हजार १६७ कोरोनाबाधित आढळले. ७ ऑगस्टला १८, ७३८, ६ ऑगस्टला १९,०४६, ४ ऑगस्टला १९,८९३ तर ३ ऑगस्टला १७,१३५ कोरोना रुग्ण देशात आढळले होते. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे देशात केंद्र सरकारनं लसीकरणावर जोर दिला आहे. केंद्राने राज्य सरकारला पत्र पाठवत कोरोना रुग्णांसाठी बनवण्यात आलेल्या मार्गदर्शिक सूचनांचे पालन करण्यास म्हटलं आहे.
सर्वांना बूस्टर डोस मोफतदेशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस (दक्षता मात्रा) १० एप्रिलपासून देण्यात येत आहे. दक्षता मात्रा खासगी लसीकरण केंद्रातही उपलब्ध आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून सर्वांना बूस्टर डोस मोफत देण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. १५ जुलैपासून ही मोहिम देशभरात राबवण्यात येत आहे.