अहमदाबाद : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून देशातील मृतांची संख्यातही वाढ झाली आहे. गुजरातमध्ये आज कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यु झाला. कोविड १९ पीडित या महिलेच्या मृत्युसह देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतांचा आकडा १३ वर पोहोचला आहे. गुजरातमधील कोरोनाग्रस्त रुग्णाचा हा दुसरा मृत्यु आहे. दोन दिवसांपूर्वीच एका ६९ वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.
गुजरातच्या सूरतमध्ये एका ६९ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. याशिवाय बडोद्याच्या एका रुग्णालयात ६५ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. मात्र या महिलेच्या कोरोना चाचणीचा अहवाल अद्याप आलेला नाही. आज गुजरातमध्ये एका ८५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६०० पेक्षा जास्त झाली असून मृतांचा आकडा १३ वर पोहोचला आहे. डेक्कन हेराल्ड या वेब पोर्टलने याबाबतचे वृत्त दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन असल्याची घोषणा मंगळवारी रात्री केली. त्यानंतर, देशभरातील नागरिकांमध्ये कोरोनाबद्दल गंभीर वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, २१ दिवस बंद असल्याने किराणा मालाच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड पाहायला मिळाली. लोकांना वारंवार सांगूनही लोक घराबाहेर पडून धोका पत्करत आहेत. देशात आज दिवसभरात कोरोनाचे ९० रुग्ण आढळून आले असून केरळमध्ये ९ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. गुजरातमध्ये तीन नवीन रुग्ण आढळले असून राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ३८ वर पोहोचला आहे.
दरम्यान, गुजरात आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, सूरतमध्ये कोरोनामुळे मृत पावलेल्या ज्येष्ठ नागरिकाला अनेक गंभीर आजार होते. याशिवाय बडोद्याच्या रुग्णालयात मृत पावलेली महिलादेखील अनेक गंभीर आजारांचा सामना करत होती. गुजरातमध्ये कोरोनामुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली होती. त्यावेळी, देशभरातील कोरोनाच्या मृतांचा आकडा सातवर पोहोचला होता. आता गुजरातमध्ये दुसऱ्या कोरोना मृत्युची नोंद झाली असून देशातील मृतांचा आकडा १३ वर पोहोचला आहे.