ओदिशामध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. बालासोरमधील बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी यांच्यात टक्कर होऊन झालेल्या अपघातातील मृतांची संख्या वाढली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार या अपघातात आतापर्यंत ३५० जण जखमी झाले आहेत. तर ५० जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र रेल्वेकडून याबाबतचा कुठलाही अधिकृत आकडा जाहीर करण्यात आलेला नाही आहे. जखमींना सोरो सीएचसी, गोपालपूर सीएचसी आणि खांटापाडा पीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. शोध आणि बचाव अभियानासाठी पथके घटनास्थळावर दाखल झाली आहेत. तसेच ओदिशा फायर आणि एमर्जंन्सी सर्व्हिसच्या २६ सदस्यांची एक अतिरिक्त बचाव टीमसुद्धा पाठवण्यात आली आहे.
या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये आणि गंभीर जखमींना २ लाख आणि किरकोळ जखमींना ५० हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात आली आहे. मदत कार्यामध्ये सुमारे ५० रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्याचे ओदिशाच्या मुख्य सचिवांनी सांगितलं आहे. जखमींनी बसमधून रुग्णालयात उपचारांसाठी पाठवण्यात आलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ओदिशामध्ये झालेल्या ट्रेन अपघातामुळे मी दु:खी आहे. दु:खाच्या क्षणी माझ्या संवेदना शोकमग्न कुटुंबांसोबत आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, ही प्रार्थना. दरम्यान, मोदींनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करून परिस्थितीबाबत माहिती घेतली आहे.
या अपघातानंतर एसडीएएच-पुरी दुरांतो एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तर पर्याय म्हणून चार ट्रेन टाटा-जेआरएलआय मार्गावरून फिरवण्यात आल्या आहेत.