नवी दिल्ली : चीन, जपानसह अनेक देशांमध्ये कोरोनामुळे स्थिती गंभीर झाल्याने केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात कोरोनाच्या नवीन व्हेरियंटबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. नीति आयोगाने लोकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचा तसेच बूस्टर डोस घेण्याचा सल्ला दिला आहे.
मांडविया यांनी आरोग्य यंत्रणेच्या देखरेख, नियंत्रण व व्यवस्थापनासाठी केलेल्या सज्जतेचा आढावा घेतला. कोरोनाच्या नवीन प्रकारांचा मागोवा घेणे सुलभ करण्यासाठी राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना सर्व कोविड पॉझिटिव्ह प्रकरणांचे नमुने ‘इन्साकॉग’ प्रयोगशाळांना पाठवण्याचा सल्ला दिला आहे.
अमेरिकेहून आलेल्या महिलेला बीएफ.७ ची बाधाअहमदाबाद : बडोदा येथे अमेरिकेहून आलेल्या महिलेला चीनमध्ये कोविडच्या वाढत्या प्रकरणांसाठी जबाबदार असलेला ओमायक्रॉनचा नवा अवतार बीएफ.७ या विषाणूचा संसर्ग झाला आहे. ही ६१ वर्षीय महिला सुभानपुरा येथील रहिवासी आहे. बीएफ.७ ची तीन प्रकरणे भारतातही नोंदली गेली आहेत.