पिंपरी चिंचवडमध्ये नायजेरियातून आलेल्या सदस्यांमुळे एकाच कुटुंबातील सहा जणांना ओमायक्रॉन या कोरोना व्हायरसची बाधा झाल्याचे वृत्त येत नाही तोच राजस्थानमध्येही तसाच प्रकार घडला आहे. राजस्थानमध्ये साऊथ आफ्रिकेतून आलेल्या एका कुटुंबामुळे नऊ जण कोरोनाबाधित सापडल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे ओमायक्रॉनचे रुग्ण सापडण्यामुळे देशातील रुग्णांचा आकडा वाढला आहे.
काल डोंबिवलीतील एक रुग्ण कोरोनाबाधित सापडला होता. परंतू आज पिंपरी चिंचवडमध्ये एकाच कुटुंबातील सहा आणि पुण्यातील एक असे सात रुग्ण एकाच दिवशी सापडले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील एकूण रुग्णांचा आकडा आठवर गेला आहे. तर राजस्थानमध्ये एकाच कुटंबातील ९ जण साप़डल्याने देशातील एकूण रुग्णांचा आकडा 21 झाला आहे.
राजस्थानच्या जयपूरमध्ये ओमायक्रॉनचे ९ रुग्ण सापडले. एक दाम्पत्य दोन मुलांसह दक्षिण ऑफ्रिकेतून जयपूरच्या आदर्श नगरमध्ये आले होते. त्यांना कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटची बाधा झाली होती. त्यांच्यामुळे कुटुंबातील जयपूरमध्ये राहणाऱ्या अन्य पाच जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. हे दाम्पत्य 25 नोव्हेंबरला भारतात आले होते.
पुण्यात कसे वाढले?२४ नोव्हेंबरला नायजेरिया देशातून आलेले ४४ वर्षीय महिला आणि तिच्या सोबत आलेल्या २ मुली तसेच पिंपरी चिंचवड शहरात राहणार तिचा भाऊ आणि त्याच्या २ मुली असे एकूण सहा जणांचे नमुने ओमायक्रॉन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणू संस्थेने आज सायंकाळी त्यांचा अहवाल दिला आहे. यामध्ये सहाही जण ओमायक्रॉनने बाधित सापडले आहेत.