नवी दिल्ली - बिहार विधानसभेची निवडणूक लांबणीवर टाकण्याची राजकीय पक्षांची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक वेळेवरच घेतली जाईल याचा पुनरुच्चार करताना निवडणूक आयोग कोरोना विषाणूची परिस्थिती नजरेसमोर ठेवून तयारी करीत आहे व ती करताना आवश्यक ती खबरदारीही घेत आहे, असे सांगितले होते. त्यानंतर, आता सर्वोच्च न्यायलायानेही बिहार विधानसभा निवडणूक थांबवता येणार नससल्याचे म्हटले आहे.
चालू वर्षाच्या शेवटच्या महिन्यात बिहारमधील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी काही राजकीय पक्षांकडून होत आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज सुनावणी झाली. त्यानुसार, बिहार विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे बिहारमधील निवडणुका थांबवता येणार नाहीत. तसेच, निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेत दखलही देता येणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. जोपर्यंत निवडणूक आयोग याबाबत काही अधिसूचना जारी करत नाही, तोपर्यंत न्यायालयाकडून यामध्ये हस्तक्षेप केला जाऊ शकत नाही. निवडणूक आयोगाकडून सावधानता बाळगतच पाऊल उचलेल. त्यामुळे ही याचिका प्रीमॅच्यूअर असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
बिहारमधील राष्ट्रीय जनता दल आणि लोकजनशक्ती पक्षासह इतर राजकीय पक्षांनी विधानसभेची निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी आयोगाकडे केली होती. निवडणूक याच वेळी घेऊन लक्षावधी लोकांचे जीवित धोक्यात घालणे योग्य ठरणार नाही, असे लोकजनशक्ती पक्षाने आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. दरम्यान, या निवडणुकीत सत्ताधारी जेडीएस-भाजपा, काँग्रेस आणि राजद हे प्रमुख पक्ष रिंगणात असतील.
बिहारमध्ये भाजपाची महाआघाडी
बिहार विधानसभेची आगामी निवडणूक राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) भाजप, जेडीयू आणि लोजप हे तीनही घटक पक्ष एकत्र लढणार आहेत. त्यासाठी, मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार नितीशकुमार यांची निवड झाल्याची घोषणा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली. नड्डा जेडीयू आणि चिराग पासवान यांच्या लोजपदरम्यान कुरबूर चालू असताना बिहार प्रदेश भाजप कार्यकारिणी बैठकीच्या समारोप सत्रात व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यामातून संबोधित करताना नड्डा यांनी उपरोक्त स्पष्टोक्ती दिली. आता, जागावाटपाचा फॉर्म्युला कसा ठरला, यावरुन चर्चा सुरू आहे. मात्र, 110, 100 आणि 33 जागांवर ही महाआघाडी निश्चित झाल्याचे समजते.
निवडणूक वेळेवरच होईल...
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी काही राजकीय पक्षांकडून होत असताना बिहार विधानसभेची निवडणूक वेळेवर होईल, असे निवडणूक आयोगाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले. बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान निवडणूक होईल, असेही संकेत आहेत. अलीकडेच निवडणूक आयोगाने कोरोनाच्या काळात निवडणुका घेण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. नियम पाळून निवडणूक प्रक्रिया पार पडेल.